प्रादेशिक पर्यटन विकास योजनाअंतर्गत विसापूर येथील बॉटनिकल गार्डन, चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थानचे प्रतीक्षालय व आसोलामेंढातील पर्यटन विकासाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करण्यात आला. दरम्यान, ५ फेब्रुवारी २०२०च्या पत्रानुसार या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा ३ मार्च २०२०च्या पत्रानुसार स्थगिती उठविली. त्यानंतर काम सुरू झाले. पुन्हा अचानक बांधकाम स्थगितीचा आदेश धडकला. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर सुरू झालेल्या कामांची सद्यस्थिती अहवाल पर्यटन संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविला. यासंदर्भात १ मार्च २०२१ रोजी केलेल्या राज्य पर्यटन विकास समितीच्या बैठकीत नवीन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार, प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०१९-२० अंतर्गत सप्टेंबर २०१९मध्ये प्रशासकीय असलेल्या कामांपैकी जी कामे कार्यारंभ आदेश देऊन सुरू झाली आहेत. त्या कामांवरील स्थगिती उठवून पुढील कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, अद्याप कार्यारंभ आदेश नसलेली कामे रद्द करण्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यानुसार चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थानचे प्रतीक्षालय, धर्मशाळा व पार्किंग आदी कामे पुन्हा सुरू होणार आहेत. या कामांना ४ कोटी ९९ लाखांची प्रशासकीय मान्यता आहे. विसापूर येथील बहुचर्चित बॉटनिकल गार्डनसाठी १ हजार ४२१ कोटींची प्रशासकीय मान्यता तसेच सावली तालुक्यातील आसोलामेंढा धरण परिसरातील पर्यटन विकासासाठी ३०० कोटींची मान्यता असून, वितरित केलेल्या निधीनुसार ही कामे पुन्हा सुरू केली जाणार आहेत.
बॉटनिकल गार्डन व बालाजी देवस्थान प्रतीक्षालय बांधकामावरील स्थगिती उठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST