Leader Tiger and cattle man face-to-face | पट्टेदार वाघ व पशुपालक आमने-सामने
पट्टेदार वाघ व पशुपालक आमने-सामने

ठळक मुद्देथोडक्यात बचावला : मोठ्या हिमतीने वाघाला दिली हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई अतिथीगृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने तोडणारा इसम व तिथेच असलेला पट्टेदार वाघ आमने सामने आले. मात्र प्रसंगावधान व हिम्मत दाखवून त्याने वाघाला चांगलीच हुलकावणी दिली. यामुळे तो थोडक्यात बचावला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
किरर्र जंगल, निर्जन स्थळ आणि त्यात एकटाच असलेला मनुष्य व त्याच्यापुढे हल्ल्याच्या बेतात उभा असलेला पट्टेदार वाघ अशी स्थिती आज हिराई अतिथी गृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात निर्माण झाली होती. खैरगाव येथील राम कुबेर बन्सीलाल यादव हा इमस त्या जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने आणण्याकरिता गेला होता. या परिसरात दाट जंगल असून पाणी पिण्याची सोय असल्याने वाघ तिथे आश्रयास होता. सदर इसम पाने तोडत असताना झुडपात बसलेला वाघ त्या इसमाच्या अगदी दोन ते तीन मीटर अंतरावर उभा झाला. राम यादव यांच्या हल्ला करण्यासाठी संधीची वाट बघत त्याच्याकडे सारखा पाहत होता. मात्र त्याने मोठ्या धैर्याने आपली कुऱ्हाड वर उचलून जोरजोराने आरडाओरड करीत एक-एक पाऊल मागे सरकविणे सुरू केले. दरम्यान हिराई अतिथीगृहाचे कर्मचारी भिंतीवर उभे राहून आरडाओरड करीत वाघाला पळविण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच राम यादव याने पटकन सुरक्षा भिंतीवरून आत उडी घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.
वीज केंद्राच्या जंगल परिसरात तीन ते चार पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. सलग दोन दिवसात झालेल्या दोन घटनेने वीज कर्मचाऱ्यात कमालीची दहशत पसरली अहे. सदर घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाला देण्यात आली. तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, विभागीय वन अधिकारी व कर्मचाºयाचा ताफा दाखल झाला होता. वनविभागाने घटनास्थळी ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत.

वाकल- मोहाळी रस्त्यावर वाघाचे दर्शन
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील लहान बालक (स्वराज) याला बिबट्याने झोपेतून नेऊन ठार केले. नंतर चार दिवसांनी गडबोरी येथील गयाबाई या वृद्ध महिलेला घरातूनच उचलून ठार मारले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी गडबोरी जवळील मुरमाडी येथील इसम नदीपात्रात जनावरांना पाणी पिण्यास नेले असता वाघाने, झडप घेऊन ठार केले. ही घटना ताजी असतानाच त्याच परिसरात दोन किमी अंतरावरील वाकल येथील सरिता बंडू मांदाळे ही आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता वाकल जवळील नदी शेजारी शेतावर भाजीपाला आणण्याकरिता गेली असता शेताशेजारी वाघाचे दर्शन झाले.शेतात वाघ दिसताच सरिताने रस्त्याच्या कडेला आरडाओरड केली. नंतर वाघ तिथून पळ काढून निघून गेला. ही वार्ता वाकल, मोहाळी गावात वाºयासारखी पसरली व स्वत: सरिता ही स्वगावी दोन किमी अंतरावर आली व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा वाकल येथील महिला, पुरुष शेताकडे गेले. तेव्हा वाघ नव्हता. मोहाळी येथे याबाबतची माहिती होताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वन कर्मचारी वनमजूर त्या ठिकाणी गेले. परंतु वाघ दिसला नाही.मुरमाडी येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला, त्याच परिसरातील वाघ असावा, अंदाज ग्रामस्थ सांगतात. मुरमाडी येथील गुराखी ठार हा नदीपात्रात झाला. त्या स्थळापासून हे शेत दोन किमी अंतरावर असून वाघाचा वावर त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोथलीत वाघीण
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक गावपरिसरात वाघ, बिबट, अस्वल यांचे दर्शन होऊ लागले आहे. शिकार व पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी गावशिवारात येत आहेत. सावली तालुक्यातील सावली उपवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोथलीजवळच्या जंगलात दोन बछड्यासह एका वाघिणीचे वास्तव्य आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेºयात या वाघिणीच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मात्र वाघिणीचे नेमके लोकेशन सांगण्यात वनविभागाने नकार दिला आहे.

Web Title: Leader Tiger and cattle man face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.