कुचना : पळसगाव ते कुचना हा जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आणि धोकादायक झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात हे रोजचेच झाले आहे.
छोट्या चारचाकी गाड्यांचे तर अक्षरशः चेंबरसुद्धा फुटतात. माल वाहतूक गाडीचे पट्टे तुटणे नेहमीचे झाले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले होते. खरं तर हा रस्ता जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकारात येत असून फार तर नऊ टन वजनाच्या वाहनांची मर्यादा असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात रेती, मुरुम, विटांचे हायवे ट्रक जात असल्याने रस्त्यावर खड्ड्यांची शृंखला तयार झाली आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने दुचाकीस्वारांचे ये-जा करणे धोकादायक झाले आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ पाहणी करून अवजड वाहनांनावर कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील जनतेकडून होत आहे.