चंद्रपूर शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. मात्र, निधीअभावी मनपाने कोविड रुग्णालय उभारू शकले नाही. त्यामुळे आमदार किशोेर जोरगेवार यांनी आज मनपात बैठक आयोजित करून विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. रुग्णालय उभारण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे आल्यानंतर, आ.जोरगेवार यांनी आमदार विकास निधीतून एक कोटी निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून तातडीने कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.आविष्कार खंडारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयासाठी इमारत उपलब्ध
कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मनपाकडे इमारत उपलब्ध आहे. रैन बसेरा येथे हे रुग्णालय तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले. कोविड रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, आक्सिजन, व्हेंटिलेटर, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी मनपा आयुक्त मोहिते यांना दिल्या.
आयुर्वेदिक रुग्णालय अधिग्रहणासाठी प्रयत्न सुरू
चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, आयुर्वेदिक रुग्णालयही कोविडकरिता अधिग्रहित करण्याच्या दिशेने आमदार जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कोरोना रुग्णांसाठी पुन्हा ३० खाटा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.