गुंजेवाही : सिंदेवाही तालुक्यात अंदाजे शंभरच्या आसपास मादगी समाजाची घरे आहेत. मात्र त्यांच्या लोकवस्तीत पाय ठेवताच सर्वत्र समस्याच समस्या दिसून येतात. अठरा विश्व दारिद्र्यात असलेला हा समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. जातिनिष्ठ व्यवसाय करीत आपली उपजीविका करणारा मादगी समाज अजूनही शासकीय योजनापासून पूर्णत: वंचित असल्याने विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर गेला आहे.गुंजेवाही व परिसरात हा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक जातिनिष्ठ व्यवसायाशी निगडित असलेला हा समाजबांधव मृत जनावरांची कातडी सोलणे, तसेच उत्सव, मयतीवर विशिष्ट वाद्य वाजवून चार पैशाच्या मिळकतीने मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करताना दिसतो. आधुनिक बॅड, संदल, डिजेच्या आगमनाने डपरी वाजविणाऱ्या मादगी समाजाचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. सर्वत्र बॅड, संदल व डिजेचाच सणासुदीला धुमधडाका असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ ओढऊ लागली आहे. शैक्षणिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. सर्वत्र शिक्षा अभियान, प्रौढ शिक्षणाचे डंके वाजत असताना काही मुले सोडली तर अनेकजण गळ्यात डफडे अटकवून वाद्य वाजविताना दिसतात.समाजाची आर्थिक स्थिती ढासळली असल्यानेच पोट भरण्यासाठी घरातील सर्वांनाच मेहनत करावी लागते. अनुसूचित जातीमध्ये मादगी समाजाचा अंतर्भाव होत असला तरी या प्रवर्गातील ५५ जातीपैकी मादगी समाज अतिमागासलेला असून शासकीय योजनांचा लाभ या समाजाला मिळत नाही. शासन पुरस्कृत स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाचा कुचकामी धोरण तसेच जाचक अटी लाभधारकांवर लादण्यात आल्याने महामंडळाच्या योजनांपासूनही हा समाज दूर आहे.लोकांच्या घरी वाद्य वाजवीत त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणारा समाज आरोग्याच्या समस्यांनीही ग्रासला आहे. त्यांच्या लोकवस्तीत पाय ठेवताच गरिबीची छाप दिसून येते. आजारांनी खितपत पडलेले वृद्ध, रोजगाराच्या शोधात असणारे बेरोजगार पाचविला पूजलेल्या दारिद्र्याच्या व्यथांनी हतबल झालेल्या महिलांचे विदारक दर्शन होते. शासनाने समाजाच्या उन्नतीसाठी या समाजावर लादण्यात आलेल्या सर्व अटी शिथिल कराव्या. (वार्ताहर)
मादगी समाज समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: May 7, 2015 01:01 IST