पिरली येथील घटना : मध्यस्थी करणाऱ्याचाच घात; आरोपी फरारभद्रावती : क्षुल्लक कारणावरुन वाद घालणाऱ्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या उपसरपंचावरच चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना तालुक्यातील पिरली येथे घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून राजकुमार वासुदेव मडावी (३५) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. गुलाब बबन कामडी (३२) हा आरोपी असून तो सध्या फरार आहे. पिरली येथील दिनेश मरसकोल्हे यांच्यासोबत आरोपी गुलाब बबन कामडी याचा क्षुल्लक कारणावरुन चार दिवसांपूर्वी वाद झाला. वाद विकोपास जाईल हे लक्षात घेता ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजकुमार मडावी यांनी मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुलाब हा काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याने मध्यस्थी करणाऱ्या उपसरपंचाच्या पोटावर आपल्या जवळील धारदार चाकूने वार केला. यात राजकुमार मडावी हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरु असताना चार दिवसांनी शनिवारच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या दिवशीपासून आरोपी गुलाब कामडी हा फरार आहे. घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून भद्रावती पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार पंजाबराव परघने करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
चाकूने वार करून उपसरपंचाचा खून
By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST