योजनांचा लाभ नाही : नागभीड नगरपालिकेत गावांचा समावेशचंद्रपूर : नागभीड नगरपालिका स्थापन करण्यासाठी परिसरातील काही गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. आता याचा परिणाम असा झाला की, या गावातील रोजगार हमी योजनेची कामे बंद झाली आहेत. निधी असतानाही ग्रामपंचायतींची विकास कामे होताना दिसून येत नाही. या गावांना भविष्यात ग्रामीण भागातील अनेक योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.शासनाने ११ एप्रिल २०१६ ला नागभीड नगर परिषदेची घोषणा केली. यात एकूण १२ गावांना जोडण्यात आले. यातील ९ गावांनी पालिकेत समाविष्ट होण्यास स्पष्ट नकार दिला. आमसभेत ठरावसुद्धा घेतला. पालिकेसाठी २५ हजार लोकसंख्येची अट आहे. नागभीड ग्रामपंचायतची लोकसंख्या केवळ १२ हजार ७९० आहे. उर्वरित लोकसंख्येची जुळवाजुळव करण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरवरील गावांना यात अंतर्भूत करण्यात आले. त्यात बामणी, बोथली, डोंगरगाव, तिवर्ला तुकूम, तिवर्ला गावगन्ना, नवखळा, चिंचोली खुर्द या गावांचा समावेश आहे. या गावांसोबतच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्येसुद्धा पालिकेत सहभागी न होण्याचा ठराव घेण्यात आला आहे.विशेष असे की, नगररचना विभागनेसुद्धा याला विरोध केला. नियमाप्रमाणे ३५ टक्के अकृषकची अट पूर्ण होत नाही. येथील १० टक्के जमीनसुद्धा अकृषक नाही. सोबत विरोध करणाऱ्या गावामधील जवळपास ९ हजार ४४० लोकांंनी पालिकेला विरोध केला आहे. नागभीड पालिका जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमीची कामे बंद झालेली आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतची कामेसुद्धा ठप्प झालेली आहेत. यासाठी ग्रामपंचायतकडे निधी आहे. मात्र कामे करता येत नाही. गावकऱ्यांना रोजगार हमीच्या कामाची प्रतीक्षा आहे.सोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांपासून शेतकरी बांधवांना मुकावे लागणार आहे. यातील बहुतेक गावांमध्ये एका वर्षांपूर्वीच निवडणुका झाल्या आहेत. ज्या गावांत महिला सरपंच आहेत, त्यांचीही पदे आता गोठविण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 01:03 IST