चंद्रपूर : केंद्र तथा राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात राज्यव्यापी जेलभरो कार्यक्रमाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा सि.आय.टी.यु.चे नेतृत्वात गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संघटीत असंघटीत क्षेत्रातील कामगार, रोजंदारी वन कामगार, अंगणवाडी महिला, आशा वर्कर, कृषीमित्र, कोलमाईन्स कामगार, थर्मल पॉवर स्टेशनमधील ठेका कामगार, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिला आदी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी १४०० मोर्चेकऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. केंद्र शासनाचा धिक्कार असो, खाजगीकरणाचे धोरण हाणून पाडा, आय.सी.डी.एस. बचाओ, योजना कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये किमान वेतन मिळालेच पाहिजे, रोजंदारी वन कामगारांना कायम करा, आदी घोषणा देत मोर्चा मुख्य रस्त्याने जिल्हा परिषदेसमोर नेण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जेलभरोमध्ये झाले. मार्गदर्शन करताना प्रा.दहीवडे म्हणाले, अच्छे दिनच्या आशेपोटी जनतेला बुरे दिन पहायला मिळाले. आता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला बुरे दिन दाखविण्याच्या तयारीला आपण लागले पाहिजे. केंद्र तथा राज्याचे सरकार कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि शेतमजुर विरोधी आहे. या सरकारने सर्व कल्याणकारी योजनांवरील खर्चात प्रचंड प्रमाणात कपात केली. त्याचा अर्थ सर्व कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या मार्गाला हे सरकार लागले आहे. ४० वर्षांपासून सुरू असलेली बालविकास योजनेचे खाजगीकरण करण्याच्या विचारात हे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. जेलभरो आंदोलन यशस्वी करण्याकरिता वामन बुटले, मैकु शहाबुद्दीन शेख, अंकुश वाघमारे, वर्षा वाघमारे, पवित्रा ताकसांडे, राजेश पिंजरकर, संध्या खनके, राधा सुंकरवार, दुशाली खोब्रागडे, उषा येनुरकर, शोभा बोगावार, पुरुषोत्तम आदे, सुशिला कर्णेवार, विठ्ठल पवार, नितेश टोंगे, सचिन झाडे, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)अत्याचारप्रकरणी एकाला अटक नागरी : येथील एका इसमाला महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी अटक केली. बाबू धाईत (४२) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (वार्ताहर)
चंद्रपुरात कामगारांचे जेलभरो आंदोलन
By admin | Updated: January 20, 2016 01:26 IST