यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पूनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी जे. पी. लोंढे, विशाल दुधे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, बरांज खुली कोळसा खाणीतील साडेचार लाख टन कोळसा २०१८ पूर्वी बेपत्ता झाला. हा कोळसा जळाला असेल तर राख दिसली होती. स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती असती. मात्र याबाबत सर्वजण अनभिज्ञ असल्याने मोठे गौडबंगाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासनाच्या नियमांनुसार गावाची किमान ७५ टक्के जमीन प्रकल्पासाठी अधिग्रहीत झाल्यास संपूर्ण गावाचे पूनर्वसन केले जाते. प्रचलित नियमांनुसारच पुनर्वसन केले जाईल. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसदर्भात योग्य मार्ग काढला जाईल. प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण पैसे मिळतील. प्रलंबित व चालू एका महिन्याचे वेतन अशा पद्धतीने कामगारांना वेतन द्यावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लवकरच कंपनीचे अधिकारी, जिल्हा प्रशासन व नागरिकांची बैठक घेऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.