सुधीर मुनगंटीवार : पाणी पुरवठ्यासंबधी घेतली बैठकचंद्रपूर : ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठ्यासंबंधीची इत्यंभूत माहिती असलेली श्वेतपत्रिका दोन महिन्यात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिल्या. यासाठी पाणी पुरवठ्याशी संबंधित असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती तयार करावी, असेही त्यांनी सांगितले. पाणी पुरवठ्यासंबंधी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील एकूण योजनानिहाय माहिती या श्वेतपत्रिकेत असणे अपेक्षित आहे. कुठल्या विभागाच्या किती योजना आहेत, त्यांची सद्यास्थिती काय आहे, सर्व पाणी स्त्रोत तपासणे, फ्लोराईड युक्त पाणी असलेल्या गावाची माहिती, नळ योजनासंबंधी संपूर्ण माहिती या श्वेतपत्रिकेत असावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.२६ जानेवारीनंतर पाणी पुरवठा मंत्री व सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील पाणी प्रश्न संबंधी ठोस निर्णय घेतले जातील. जिल्ह्यातील सर्व विहिरी व विंधन विहिरीवर फलक लावण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. विहीर व विंधन विहरीचे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही. त्या फ्लोराईडची मात्रा किती आहे, ही माहिती या फलकावर नमुद करण्यात यावी. पाणी पुरवठा व जीवन प्राधिकरणने जिल्ह्यातील शुध्द पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत विकसित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत पालकमंत्री यांनी पाणी टंचाई कृती आराखडा योग्य पध्दतीने तयार करण्याचे निर्देश दिले. दूषित पाणी असलेली गावे व त्यावरील उपाययोजना यासंबंधी माहिती देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्याची पाणी श्वेतपत्रिका तयार करण्याचे निर्देश
By admin | Updated: November 21, 2015 00:54 IST