ब्रह्मपुरी : नुकतीच भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील शिशु केयर युनिटमध्ये अचानक लागलेल्या आगीत लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला.
त्यामुळे सदर घटनेची गांभीर्यता लक्षात घेत ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आग नियंत्रणासाठी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे ब्रह्मपुरी शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर मागणीचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. खिल्लारे यांना देण्यात आले. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
रुग्णालयात सर्वत्र आग प्रतिरोधक यंत्रणा बसविणे, आगीची पूर्वसूचना देणारे अलार्म लावणे, रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात किमान एक कर्मचारी कायम उपस्थित असले पाहिजे, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशमन तंत्राचे वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावे, रुग्णालयात आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग असावे, गर्दी नियंत्रणासाठी रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असला पाहिजे व रुग्णालयात रिक्त असलेले पदे तातडीने भरण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना भाजयुमोचे शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवे, रितेश दशमवार, दत्ता येरावार, अन्वर शेख, रजत थोटे, प्रमोद बांगरे, अरुण बनकर, गणेश लांजेवार, तनय देशकर हे उपस्थित होते.