मोर्चा आणि चक्काजाम : धनगर समाजाचे जिल्हाभर आंदोलनचंद्रपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करून आरक्षण द्यावे यासाठी धनगर समाज कृती समितीतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात काही समाजबांधवांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला. तर, भिसीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन देवून मागण्यांकडे लक्ष वेधले.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. याचाच भाग म्हणून आज धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तालुकास्तरावर आंदोलन केले. चंद्रपूर शहरात धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन केले. भिसीमध्ये चक्काजाम आंदोलन केले. मूल, सावलीमध्ये रॅली काढण्यात आली. चंद्रपूर येथील आंदोलनाचे नेतृत्व डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. भिसी येथे संजय कन्नावार, मूल येथे डॉ. तुषार मर्लावार, वरोरा गजानन शेळके, डॉ. सरोदे, भद्रावती मनोज हाके, गडचांदूर महेश देवकाते, डॉ. अतुल मंदे, कोरपना, नांदाफाटा येथे साईनाथ बुच्चे आदींनी नेतृत्त्व केले. विशेष म्हणजे, भिसी येथील आंदोलनादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वॉर्ड क्र. ५ मधील अहिल्याबाई चौकातून रॅली काढण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरु होते. यावेळी समाजबांधवांनी बकऱ्या, मेंढा आंदोलात आणल्या. चंद्रपूर येथे वासुदेव आस्कर, सुनील पोराटे, जानबा गावंडे, रमेश उरकुडे, योगीराज उगे, सुनिल इखारे आदींनी मुंडन केले. यावेळी महादेव गराट,सविता नवले, ललिता गराट, हुलके,डॉ.कन्नावार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
मुंडण करून शासनाचा निषेध
By admin | Updated: August 14, 2014 23:38 IST