चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास : डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला वीज जोडणी मिळणारचंद्रपूर : राज्याला वीज देण्याचे राष्ट्रीय कार्य चंद्रपूरकरांनी केलेले आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी संपूर्णरित्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येणार असून जिल्ह्याचा कायापालट करण्याची ग्वाही नवीन व नवीकरणीय व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत एकही शेतकरी वीज जोडणीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.पुनर्रचित गतिमान विद्युत विकास आणि सुधारणा कार्यक्रमांतर्गत दुगार्पूर येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे , पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे आदी उपस्थित होते.उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चंद्रपूरकरांनी राज्याला वीज देऊन राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. या जिल्ह्यात ३५ वर्षांहून अधिक काळाचे जुने खांब, प्रकल्प यामुळे वीज निर्मितीवरही परिणाम होतो आहे. त्यामुळे आपल्याला सौर उर्जेचाही वापर करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. तसेच चंद्रपूर आणि बल्लारशाह या ठिकाणी भूमिगत वाहिन्यांनी शहराला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन करावे. शेतकऱ्यांना जून २०१६ पर्यंत संपूर्ण कृषी पंपाची वीज जोडणी द्यावी, त्याचबरोबर यापुढील काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचवून त्यांना वीज सेवेचा लाभ देऊन ते वीज जोडणीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या जनतेची मागणी विचारात घेऊन चंद्रपूरच्या विकासासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याला न्याय देण्याचे कार्य उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांचे नियोजन अतिशय बारकाईचे असते. आमचे शासन राज्याच्या प्रगतीसह चंद्रपूरच्या विकासासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत चंद्रपूर शहराचा कायापलट करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे यांनीही कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून अधिकाधिक प्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे, असे मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार महावितरणतर्फे करण्यात आला. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना श्यामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत दुगार्पूर येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
दुर्गापूरच्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन
By admin | Updated: October 14, 2015 01:24 IST