मनोज गोरे कोरपनाकोरपना शहराला कधी तालुक्याचा दर्जा मिळेल असे वाटले नाही. मात्र तो मिळाला. त्यामुळे शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त झाली. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळे अद्यापही हे तालुकास्तराचे शहर अद्यापही अविकसित आहे. पूर्वी राजुरा तालुक्यात जिवती आणि कोरपना तालुक्याचा समावेश होता. मात्र त्यानंतर कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. चंद्रपूर, यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कोरपना शहराला गेल्या काही वर्षात महत्त्व प्राप्त झाले आहे. या तालुक्याची आदिवासी नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असून तालुक्यातील समस्या मात्र अद्यापही सुटू शकल्या नाहीत. शासनाने आता तालुका स्थळाना नगर पालिकेचा दर्जा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तशी घोषणाही झाली. त्यामुळे कोरपना शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. मात्र शहरासह तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील भारत संचार निगमच्या कार्यालयातील भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. इंटरनेटच्या अधिक वापराने आता लॅण्डलाईनधारकांची संख्या वाढली आहे. अशात या कार्यालयाकडून नियमित मासिक बिलाचे वितरण करण्यात येत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. दोन महिन्यानंतर एकदाच बिलाचे वितरण करण्यात येते. परिणामी ग्राहकांचे आर्थिक नियोजन तर बिघडत आहे. सोबतच सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.शासनाकडून लाखो रुपयांचे तलावाच्या सौंदर्यीकरणाकरिता येत असतात. मात्र आजघडीला कोरपना येथील तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या सौंदर्यीकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या तलावाच्या परिसरात संपूर्ण अस्वच्छता पसरली आहे. तलावाचे सौदर्यींकरण झाल्यास येथील नागरिकांना विसावा घेण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. शहरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता कोट्यवधी रुपयांची पाण्याची टाकी शोभेची वास्तू ठरली आहे. कोरपना चौक कसे गजबजलेले असतात. बसस्थानक नसल्याने मिळेल त्या जागेवर उभे राहून प्रवासी बसची प्रतीक्षा करतात. मात्र येथे बसस्थानक व्हावे, यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही.
विकासाबाबत पुढाऱ्यांची अनास्था
By admin | Updated: February 16, 2015 01:15 IST