लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि शहरामध्ये धोबी समाज राहतो. धोबी समाजालाच वरठी आणि परीट म्हणूनही संबोधले जाते. परंतु महाराष्ट्रात जातीच्या यादीत धोबी आणि परीट एकाच क्रमांकावर म्हणजे १५५ वर नमूद आहे. मात्र वरठीचा उल्लेख १६६ क्रमांकावर असल्याने जात प्रमाणपत्र काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. धोबी समाजाची ही मागणी विचारात घेऊन राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण समितीने वरठीचाही उल्लेख यापुढे १२५ क्रमांकावर करण्याचा निर्णय घेतल्याने धोबी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्य शासनाच्या २६ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार जातीतील यादीत १२५ क्रमांकावर धोबी, परीट, तेलगू मडेलवार (परीट) सह आता १६६ क्रमांवरील वरठीचा उल्लेख वगळून तो १२५ या एकाच क्रमांकावर केला जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोबी समाजाला होणार आहे.
मिळत नव्हते जात प्रमाणपत्र...धोबी समाजातील अनेक कुटुंबात पणजोबा, आजोबाची जात वरठी तर मुलाची जात शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर धोबी वा परीट लिहिलेली आहे. मुलाच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर धोबी आणि परीट तर १९६० पूर्वीच्या आजोबाच्या नावापुढे वरठीचा उल्लेख असल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. यामुळे आधीच गरीब आणि अशिक्षित असलेल्या या समाजातील मुलांना शिक्षण घेताना शासनाच्या सवलती घेताना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपुरातील संत गाडगेबाबा, वरठी समाज मंडळाने स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध पातळीवर तसेच राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून वारंवार पाठपुरावा केला. अखेर या मागणीला यश आले आहे.