चंद्रपूर : संपूर्ण मानवजातीला कलंकीत करणाऱ्या व पुरोगामी महाराष्ट्रातील शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या २० आॅक्टोबरला घडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावातील जाधव परिवारातील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने एका लेखी निवेदनाद्वारे येथील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनी केली आहे.दलित हत्याकांडाला घेऊनच भाजप सरकारचा राज्यात उदय झाला आहे. एकीकडे गोरक्षण कायद्याची मागणी करणारे, गायीला माता माणून तिची पूजा करणारे, गाईची हत्या करू नये, अशी मागणी करणारे, जिवंत माणसाची खुलेआम कत्तल करून काय संदेश देवू पहात आहे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.गेली १४-१५ दिवस लोटूनही येथील पोलीस प्रशासन आरोपीचा शोध घेवू शकत नाही. त्यामुळे आरोपींना पोलिसाद्वारे अभय देण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशी शंका भारिप बहुजन महासंघाने व्यक्त केली आहे. एकीकडे अॅक्ट्रासिटी दाखल करायची तर दुसरीकडे आरोपीचे नाव माहित नाही. साधा त्याचा चेहरा माहीत नाही, असे सांगितले जात आहे. यामागे नेमकी पोलिसांची भूमिका काय? असा प्रश्नही निर्माण होत आहे. सदर घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेची सीबीआय चौकशी करावी, दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, नगर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना जबाबदार धरून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष कुशल मेश्राम, पी.व्ही. मेश्राम, सुरेश नारनवरे, रूपचंद निमगडे, राजूभाऊ किर्तक, मधुभाऊ वानखेडे, रुचा लोणारे, शालू कांबळे, विवेक पेटकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जवखेडे हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करा
By admin | Updated: November 6, 2014 01:20 IST