पाटण : जिवती तालुक्यातील कोलांडी या गावाच्या कडेला एका मेटॅडोरचा अपघात झाला. त्यात चोरीतील सागवानाचे ५१ बिट्स सापडले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला. परंतु आरोपी अजुनपर्यंत मोकाटच आहेत.जिवती तालुक्यातील कोलांडी या गावाच्या कडेला अपघात झालेल्या मेटॅडोरमध्ये ८० सागवानाचे बिट्स होते; पण वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पोहचायला उशिर झाल्याने गावातील काही नागरिकांनी सागवान पळविल्याची चर्चा आहे. डोंगरगाव येथील एक व्यापारी, शेणगाव येथील एक चालक व जिवती येथील गाडी मालक यांनी यापूर्वीही सागवानाची तस्करी केल्याची चर्चा आहे. याकडे मात्र वनअधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आरोपी अजुनपर्यंत मोकाटच आहेत. याप्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप केल्या जात आहे. शेणगावातील चालक मुख्य सुत्रधार असल्याची माहिती आहे. त्याने यापुर्वीही विविध वाहनांमधून डोंगरगाव, भाईपठार येथील सागवानाची चोरी केली व ते तेलंगानातील कागजनगर येथे नेवून विकल्याची चर्चा आहे. वन अधिकाऱ्यांना याची माहिती असूनसुद्धा त्याला अजुनपर्यंत विचारणा करण्यात आली नाही.याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी आहे. जिवती तालुक्यातील जंगलामध्ये मौल्यवान सागवान आहे. या जंगलात दरवर्षी आंध्र प्रदेशातील सागवान तस्कर शिरकाव करतात. मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या लाकडे तोडून त्याची आंध्रात तस्करी करतात. वन विभागाला याची जाणिव असूनही या तस्करीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील वनसंपदा मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. (वार्ताहर)
अवैध सागवान तस्करीचे तार शेणगावात
By admin | Updated: November 1, 2014 22:50 IST