सावली : जिबगाव येथील तलावालगत अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच नायब तहसीलदार एल.जी. पेंढारकर यांच्या चमुने भेट दिली. यात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचे आढळल्याने चार टॅक्टर व एक जेसीबी जप्त करुन ड्रायव्हरला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ट्रॅक्टर व जेसीबी यंत्र तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.जिबगाव व पेठगाव रस्त्याच्या मधोमध तलाव आहे. या परिसरात नेहमीच अवैध गौण उत्खनन होत असते. पेठगाव येथील पांदन रस्त्याच्या कामाकरीता कंत्राटदाराने अवैध मुरुम उत्खनन करुन वाहतूक करीत होते. याची गोपनिय माहिती नायब तहसीलदार पेंढारकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या चमूसह प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा अवैध उत्खनन आढळून आले. याप्रकरणी चार टॅक्टर व एक जेसीबी खोदकाम करीत असताना जप्त करण्यात आले. घटनेचा पंचनामा करुन शांताराम महादेव भांडेकर रा. रयतवारी, बबन रावजी सोनटक्के रा. रयतवारी, विठा बाजीराव शेरकरी रा. मोखाळा, रुमाजी नानाजी कोहळे रा. सामदा यांच्या चार ट्रॅक्टर व सावली येथील एकाचा जेसीबी यंत्र जप्त करण्यात आला. याप्रकरणी २७ हजार ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) वेकोलित जाणारी रेतीची वाहने पकडली ४राजुरा : राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यानी बुधवारच्या रात्री २ वाजता कोलगाव रेती घाटावरुन वेकोलिमध्ये जाणारे चार ट्रक पकडले. एम.एच ३१ सीक्यू-५८३१, एम.एच. ३१- सीबी-८०९७, एम.एच.३४-एबी-६५६२, एम.एच.३४- एबी-३७९७ या क्रमांकाच्या वाहनाकडे रेती वाहतूक करताना किती ब्रास रेती आहे, याचा उल्लेख आणि वेळ दिलेली नव्हती. त्यामुळे रेतीची चोरी करुन वाहनाद्वारे वेकोलिमध्ये पाठवित असल्याच्या संशयावरुन राजुराचे तहसीलदार व त्यांच्या चमुने कारवाई केली.
अवैध मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त
By admin | Updated: January 22, 2016 02:06 IST