चंद्रपूर : सावली तालुक्यातील गावागावात महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो रुपयांचे काम वेगवेगळ्या स्वरूपात सुरू होते व अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. मात्र, रोजगार हमी योजनेचे काम होऊन तीन-चार महिन्यांचा कालावधी लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येत असून याबाबत मजुरांतून रोष व्यक्त केला जात आहे.सावली तालुक्यात पांदण रस्ता बांधकाम, बोडी, शेततळे, शेतातील मातीकाम या स्वरूपात रोजगार हमी योजना राबविली जात आहे. आपल्या दैनंदिन गरजा पुरविण्यासाठी आर्थिक बजेट नसल्यामुळे मजुरांना नेहमीच रोजगार हमी योजनेची प्रतीक्षा असते. मात्र, योजनेअंतर्गत काम करून तीन-चार महिन्यांचा कालावधी लोटूनही मजुरी मिळाली नसल्याने मजुरांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांना रोजगार हमी योजनेचा आसरा घ्यावा लागतो. मात्र या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मजुरीला विलंब लागत असल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या काही मजुरांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याची ओरड गावागावातून केली जात आहे.रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम तर मिळाले, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व ग्रामपंचायत रोजगार सेवकांच्या हलगर्जीपणामुळे कामाचे ‘मस्टर’ मात्र थांबून राहाते. झालेल्या कामाचे मस्टर तीन ते चार हप्त्यांनी मोजमाप करून पंचायत समितीकडे सादर केले जातात. त्यामुळे कामाचा मोबदला मिळण्यासाठीसुद्धा तितकाच विलंब होत आहे. अनेक गावात रोजगार हमी अंतर्गत काम चालू असून काही गावात अजूनही कामाची सुरूवात झालेली नाही. गतवर्षी केलेल्या कामाची पूर्तता यंदा तरी होणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोजगार हमी योजनेतंर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा त्रास मजुरांना वारंवार सोसावा लागत आहे.योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी हप्त्याला बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
रोहयो मजुरांवर उपासमार
By admin | Updated: May 18, 2015 01:26 IST