लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडताच वर्धा आणि पैनगंगा नद्यांना मोठा पूर आला. या पुराने शेकडो हेक्टर पाण्याखाली आली. कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यांतील पिकांना मोठा तडाखा बसला. १५ पेक्षा अधिक मार्ग बंद झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगावाला पुराच्या पाण्याने वेढले घातला. वर्धा नदीच्या बैंक वॉटरने इरई नदीचे पाणी शहरात शिरण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंद्रपुरात सकाळी लख्ख उन्ह निघाले होते. दुपारी २ वाजतानंतर वातावरण अचानक बदलले. आकाश गच्च भरून येताच काही क्षणातच धो धो बरसला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जागा मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला.
डोंगरगाव-भेंडाळा प्रकल्प क्षेत्रातही नुकसानविरूर स्टेशन : मागील चार दिवसांपासून या परिसरात सततधार सुरू असल्याने नाल्यांना पूर आला. त्यातच वर्धा आणि पैनगंगा नदीने शेकडो हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, सोयाबीन, धान, मिरची, भाजीपाल्याची पाण्याखाली आली आहे. डोंगरगाव व भेंडाळा हे दोनही सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामुळे काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र-तेलंगाना सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा, कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चणाखा, कोहपरा, पंचाळा, चुनाळा, बामनवाळा, विचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबाळा, सिर्शी अशा एकूण १२ गावांतील शेती पाण्याखाली आहे. डोंगरगाव-भेंडाळा सिंचन प्रकल्प क्षेत्रातील केळझर, नवेगाव, भेंडाळा, बेरडी, चिचबोळी, सोनुर्ली, सोंडी, चिंचाळा, डोंगरगाव, पिंपळगाव, कोष्टाळा, लक्कडकोट, घोट्टा, सुब्बई, बापूनगर, थोमापूर, मुंडीगेट शिवारातील पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
राजुरा पुलावर पोलिसांचा पहाराबल्लारपूर: पुराचे पाणी वाढू लागल्याने सावधगिरी म्हणून पोलिसांनी राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा पुलाजवळ बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे काही वाहनधारकांनी सास्ती या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. या मार्गावर वाहनांची मोठी रांग दिसून आली. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने कापूस, सोयाचीन, तूर, धानाचे मोठे नुकसान होऊ शकते. राजकुमार शर्मा यांनी ५० हजार रुपये खर्च करून बानाचे रोवणे केले होते. सर्व पीक सध्या पाण्याखाली आहे.
तीन किमी पायी प्रवास करून आणला मृतदेहमुडीगेट दक्षिण मध्य रेल्वे लाइनवर अज्ञात इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती विरुर रेल्वे स्टेशन मास्टरने सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे यांना दिली. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. पोलिस पथकाने बॅटरीच्या उजेडात तीन किमी अंतर पायदळ कापत रात्री ९:३० वाजता घटनास्थळ गाठले. इसमाचा मृतदेह दोराने बांधून ठाण्यात आणला.
"पुराच्या नुकसानीची तीव्रता मोठी आहे. कोरपना, जिवती, राजुरा या तिन्ही तालुक्यांत पाऊस सुरूच असल्याने आणखी मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर ओसरताच पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी."- अॅड. वामनराव चटप, माजी आमदार राजुरा