लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या केंद्रीय निवडणूक आयोग मतांच्या चोरीच्या आरोपवर देशभरात चर्चा सुरू असताना, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील पिपरी गावात एकाच झोपडीवजा घरात ११९ मतदार आढळून आले. हे सर्व मतदार बोगस आहेत, असा आरोप घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केला आहे.
घुग्घुसनजीक पिपरी येथील घर क्रमांक ३७५ हे अरुणा मच्छिंद्र कोटवाडे यांच्या मालकीचे आहे. या झोपडीवजा घरात कोटवाडे दाम्पत्य दोन मुलांसह राहतात. मात्र, त्यांच्या दोन मुलांची नावे मतदार यादीत नाहीत. केवळ कोटवाडे दाम्पत्याचीच नावे मतदार यादीत आढळली. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तरीही त्यांच्या घराच्या पत्त्यावर ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. कोटवाडे यांच्या घराच्या पत्त्यावर नोंदविलेल्या सर्व मतदारांची आम्ही तपासणी केली. तपासणीनंतर हे मतदार गावातीलच असल्याचे आणि ते हयात असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ बोगस नोंदणी झाली, असा दावा रेड्डी यांनी केला आहे.
एकाच ठिकाणी नोंदणी का झाली?पिपरी गावात एकूण १ हजार ४१२ मतदार आहेत. एकाच झोपडीच्या पत्त्यावर ११९ मतदारांची नोंदणी करण्यामागे कुणाचा हात आहे. ही नोंदणी करून घेण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरण्यात आले काय, असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी राजू रेड्डी यांनी केली आहे.