चंद्रपूर: यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्टरवरील कपाशी, ९३ हजार हेक्टरवरील सोयाबीन तसेच तूर, ज्वारीचे पीक धोक्यात आले होते. अनेक शेतांमधील झाड वाळत होते. सोयाबीनवर उंट अळीने आक्रमण केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. मात्र आता पावसाने हजेरी लावल्याने, सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नाची आशा बळावली आहे. सध्या सोयाबीनवरील उंट अळीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धानाला लष्कळी अळीने वेढले आहे.यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्यात ४५ हजार हेक्टरने घट झाली असून १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरली आहे. तर ९३ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला आहे. पावसाने प्रथम विलंब केल्याने यावर्षी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांनी सोडली. अनेक शेतातील पीक करपण्याच्या मार्गावर होते. विशेष म्हणजे सोयाबीनवर लष्करी अळीने आक्रमण केल्याने हातातील पीक जाणार अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र पावसाने हजेरी लावल्याने तसेच लष्करी अळीचा प्रादूर्भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात यावर्षी प्रथमच कपाशीचा पेरा वाढला आहे. मात्र कपाशीचे पीक पाण्याअभावी खुंटले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीच्या वाढीला आधार मिळाला आहे. मात्र यावर्षी सीतादेवी लांबणीवर होणार असून शेतकऱ्यांचा दसरा, दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची कपाशीवर आशा
By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST