बल्लारपूर: नगर परिषद बल्लारपूरच्यावतीने येथील फुलसिंग नाईक वॉर्डात होमिओपॅथी रुग्णालयाचे उद्घाटन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले.
करोना काळात वैद्यकीय सेवा सर्वात जास्त प्रभावित झाली होती. सोबतच अलिकडच्या काळात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू होता. भविष्यात अशा महामारी लक्षात घेऊन व परिसरातील वैद्यकीय सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीने व शहरातील इतर शासकीय वैद्यकीय सेवेवरील वाढता ताण लक्षात कमी करण्याकरिता बल्लारपूर नगर परिषदेच्या माध्यमातून होमिओपॅथीक रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात डॉ.सुनील पाकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून रुग्णालयात अत्याधुनिक सॉफ्टवेअर व संगणक प्रणाली उभारण्यात आली आहे. उत्तम प्रकारच्या समचिकित्सा प्रणालीच्या (होमियोपॅथी) आधारे सर्वंकष व परिपूर्ण सोयीयुक्त रुग्णालय उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बल्लारपूर शहरातील गोर-गरीब जनता व सर्वसामान्य नागरिक यांनी या रुग्णालयाचा उपयोग करावा, असे आवाहन नगराध्यक्ष हरीश शर्मा,मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी केले.