शंकर चव्हाण - जिवतीजिवती-गडचांदूर तसेच गावखेड्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरत असून भरधाव वेगाने धावणारी काळीपिवळी आणि लालमातीच्या टिपरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. असे असतानाही रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पहाडावरील रस्ते मृत्यूचा मार्ग ठरत आहे.गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिल्या जात आहे. शासनस्तरावरुन कोट्यावधी रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च केले जातात. तरीही पहाडावरील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. जिवती ते गडचांदूर, जिवती-परमडोली, पाटण-जिवती, मराईपाटण, भारी, शंकरपठार, कोलांडी, सोरेकासा, धनकदेवी, कुंभेझरी, लेंडीगुडा, अंतापूर, नारायणगुडा, पून्नागुडा, पालडोह आदी गावातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र तेही मलमपट्टीसारखेच काही दिवसानंतर रस्ते जैसे थे होतात, अशी गंभीर स्थिती आहे. गडचांदूर-जिवती-माणिकगड मार्गे हा २० किमीचा प्रवास आहे. सर्वाधिक कर्मचारी व नागरिक जवळचा प्रवास म्हणून याच मार्गाने ये-जा करतात. दिवसभर वर्दळ असलेल्या वळणदार रस्त्यावरील खड्डे आणि भरधाव वेगाने चालणाऱ्या लालमातीच्या वाहनामुळे प्रवास धोकादायक बनले आहेत. रस्ते वळणदार असल्याने रात्रीच्या वेळेस अपघात घडत आहे. जिल्हा परिषद सदस्या सुजाता भगत यांनी धोकादायक ठरत असलेल्या वळणदार रस्त्यावर संरक्षण तट भिंतीचे काम करण्यास शासनास भाग पाडले. मात्र उर्वरीत कामे जैसे थे आहेत. याच रस्त्यावर हेमाडपंथी विष्णुचे मंदिर आहे व पुरातन किल्ला सुद्धा असल्याने या ठिकाणी शाळेच्या सहली, विष्णु मंदिराच्या दर्शनासाठी विविध जिल्ह्यातून भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र येथील रस्त्याची दयनीय अवस्था विकासाला अडसर ठरू लागली आहे. रस्ते हे प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही रस्ते धोकादायक ठरत आहेत. पायवाटेने किती दिवस जायचे?खडकीहून अन्य गावाला जाण्यासाठी पायवाटेचा आधार घ्यावा लागते. साधा खडीकरण केलेला रस्ता नाही त्यामुळे वाहने तर सोडाच शिक्षका व्यतिरिक्त कुठले कर्मचारी गावात जात नाही. देश स्वातंत्र्यातून मुक्त झाला असला तरी जंगल मुक्त अजुनही झालेला नाहीत. अजून किती दिवस हा संघर्ष करावा लागणार अशी व्यथा खडकी, रायपूर ग्रामपंचायत मधील खडकी या आदिवासी कोलामांनी ‘लोकमत’समोर मांडली आहे.अत्यंत हलाकीचे जीवन जगणाऱ्या कोलामांनी आपली व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मांडली. मात्र दखल कोणी घेतली नाही. रस्त्याअभावी ना विकास ना बाजारपेठ, तहसील, पंचायत समिती पोलीस ठाणे तर नागरिकांना माहितच नाही. आजार झाल्यास अडचणींना तोंड द्यावे लागते. खडकी या गावात रस्ता नसल्याने दवाखाण्यात लवकर पोहचता न आल्याने आजपर्यंत या गावातील १५ जणांना जीव गमवावा ुलागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अजून किती दिवस आम्हाला खडतर प्रवास करावा लागणार असा सवालही गावातील कोलाम बांधवानी केला आहे. प्रशासन आता तरी दखल घेऊल का असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे.
खड्ड्यांमुळे पहाडावरील रस्ते ठरताहेत मृत्युमार्ग
By admin | Updated: November 23, 2014 23:17 IST