लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सरपंचपदाच्या निवडणुका सुरू आहेत. ठिकठिकाणी अनेक जण सरपंचपदासाठी धडपड आहे. अशातच राजुरा तालुक्यातील सात सदस्यीय धिडशी ग्रामपंचायतीमध्ये एका उच्चशिक्षित तरुणीची सरपंचपदी वर्णी लागली आहे. इतकेच नव्हे, तर राजुरा तालुक्यातील सर्वात कमी वयाची तरुणी गावाची कारभारीन ती झाली आहे.राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून रीता हनुमंते निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने तालुक्यात सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान रीता हनुमंते यांना मिळाला आहे. रीता हनुमंते यांनी एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरपंचपदी निवड झाली असली, तरी शिक्षण सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही रीता हनुमंते यांनी जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केला होता. अपक्ष असताना राजकीय पक्षांना, आघाड्यांच्या उमेदवाराला पराजीत करून विजय संपादन केला. त्यांच्या चार अपक्ष उमेदवार निवडून आले. यामध्ये उच्चशिक्षित म्हणून रीता हनुमंते यांच्या गळात सरपंचपदाची माळ पडली.
नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले. मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आणि माझी धिडशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी निवड झाल्यामुळे मी सर्व मतदाराचे आभार मानते. मी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सर्वोतोपरी गावाचा विकास करणे, हाच माझा हेतू आहे. - रीता हनुमंते, नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत, धिडशी