Heritage Walkmdhun Fort Tourism | हेरिटेज वॉकमधुन किल्ला पर्यटनास चालना
हेरिटेज वॉकमधुन किल्ला पर्यटनास चालना

ठळक मुद्देइको-प्रो चे आयोजन : किल्ला पर्यटनातुन गोंडकालीन इतिहासाला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा येथील नागरिक प्रतिसाद देत आहेत. रविवारी इको-प्रोद्वारे हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माहेश्वरी समाज महिला मंडळ तसेच जिल्हा युवा शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला-परकोटाची स्वच्छता अभियानास ७५० दिवस पूर्ण होत असुन आपल्या ऐतिहासिक वारसा विषयी नागरिकांमध्ये आस्था निर्माण व्हावी यासाठी मागील वर्षभरापासुन हेरीटेज वॉक या किल्ला पर्यटनास चालना देण्याचा उपक्रमास इको-प्रोने सुरूवात केली आहे.
रविवारच्या हेरीटेज वॉक उपक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, बँक आॅफ महाराष्ट्र झोनल शाखेचे मुख्य व्यवस्थापक गजभीये, अमर गिये, माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचिता राठी आदींसह माहेश्वरी महिला मंडळाच्या ५० महिला सदस्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी हजेरी लावली.
गड खिडकी परिसरातून सकाळी साडेपाच वाजता हेरीटेज वॉकची सुरूवात करण्यात आली. यावेळी बुरूज क्रंमाक ४ ते ९ वरून म्हणजेच बगड खिडकी ते अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवास करण्यात आला. परकोटावरील पादचारी मार्ग, पिएचनगर मागील लोंखडी ब्रिज, बगड खिडकी, मसन खिडकी, गोंडराजे समाधीस्थळ, रामाळा तलाव, अंचलेश्वर मंदीर, गोंड राजचिन्ह याबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी पर्यटकांना माहिती दिली.
सहभागी पर्यटकांमध्ये माहेश्वरी महिला मंडळच्या गौरी काबरा, सोनल मुंदडा, अल्का चांडक, कोमल सारडा, अर्चना बजाज, सुनिता सोमानी, अर्चना मुंधडा, लिना राठी, शिल्पा जाजु आदी सहभागी झाल्या होत्या. यावेळी इको-प्रोचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे शहरातील समृद्ध वारसा इतरांना दाखविण्याकरिता हेरीटेज वॉकमध्ये अन्य नागरिकांना सहभागी करण्याचा संकल्प करण्यात आला.


Web Title: Heritage Walkmdhun Fort Tourism
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.