चंद्रपूर : समाजात विधायक कामात सातत्यपूर्ण योगदान देऊन बदल घडवू पाहणारी मोजकी तरुणाई दिसते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील अवघ्या २३ वर्षांचा दीपक चटप यांचे नाव यामध्ये अग्रगण्य ठरत आहे. केवळ चंद्रपूरच नव्हे तर राज्य, देशपातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण चळवळीतील त्याचे काम भल्याभल्यांना दिशादर्शक ठरत आहे.
मूळचा लखमापूर येथील छोट्याशा गावातून पुढे आलेल्या दीपकने पुण्यातील नामांकित आयएलएस विधि महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणाकरिता नुकतीच त्याची लंडन येथील विद्यापीठात निवड झाली. पद्मश्री डॉ. अभय बंग याच्या मार्गदर्शनात निर्माण शिबिरातून दीपकला दिशा मिळाली. तो बालवयापासून शेतकरी चळवळीत सक्रिय आहे. दीपकने शालेय जीवनात राज्यातील नामांकित वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा जिंकून अभ्यासू वक्ता म्हणून नावलौकिक मिळाला. देशातील नामांकित कोरो इंडिया संस्थेची फेलोशिप दीपकला मिळाली. राज्याच्या युवा धोरण चर्चासत्रात दीपकने विदर्भातील युवकांची भूमिका मांडली. न्यायमूर्ती गिरटकर यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयात काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०१७ साली इंटर्नशिप करून विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमाने विविध प्रश्नांवर वाचा फोडली. यासोबतच युवकांना घेऊन पाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना लाखोचे साहित्य वितरित केले. तसेच कोरपना तालुक्यातील ३५ गावांतील ६० कुषोषित बालकांना 'जाणीव माणुसकीची' अभियान राबवून पोषण आहार संच व मोफत आरोग्य तपासणी कार्ड वितरित केले.
बॉक्स
अरबी समुद्राच्या प्रदूषणासंदर्भात टाकलेलेल्या याचिकेला यश
विधिज्ञ असिम सरोदे यांच्यासोबत मुंबई येथील अरबी समुद्राच्या प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केल्याने तत्काळ शासन व हाजी अली दर्गाह ट्रस्टने पुढाकार घेत जलप्रदूषणावर आळा घातला. राज्य मानवाधिकार आयोगाकडे मंत्र्यालयातील शेतकरी आत्महत्याविषयक तक्रार दाखल केल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता विशेष न्यायाधिकरण अस्तित्वात यावे, म्हणून कृषी न्यायाधिकरण कायद्याचा मसुदा तयार करून लोकसभेत खासदार राजीव सातव यांच्यामार्फत अशासकीय विधेयक मांडले.
बॉक्स
दोन पुस्तके प्रकाशित
दीपकचा वयाच्या १७ व्या वर्षी ‘लढण्याची वेळ आलीय’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पाणीविषयक कायदे या पुस्तकाचे संपादन केले. नुकतेच ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे नव्या कायद्यावरील त्याचे प्रकाशित पुस्तक चर्चेत आहे. त्यासोबतच अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची स्थापना करून नवोदितांना साहित्याचे चळवळीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.