विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे बुधवारी लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. त्यात एकाही कुटुंबाला आगीतून घरातील साहित्य बाहेर काढता आले नाही. आगीमुळे पाच घरांचा संसार उघड्यावर आल्याने पुढील जीवन कसे जगावे, असा प्रश्न अपघातग्रस्तांवर निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन विरूर येथील काही समाजसेवकांनी मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.बुधवारी ४ वाजताच्या सुमारास अचानकपणे वारलु देवाजी नारनवरे यांच्या घराला आग लागली. जोरदार वारा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता-पाहता अवती-भोवतीच्या अन्य घरांनाही आगीने आपल्या विळख्यात घेतले. त्यांच्या घरात दोन बेड, टिव्ही, आलमारी, फ्रिज, होम थिएटर, कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तुसह जनावरांचे वैरणसुद्धा जळून खाक झाले. आगीमुळे घरातील एकही वस्तु बाहेर काढता आली नाही. संपुर्ण घराची राखरांगोळी झाली. जोरदार वारा असल्याने घराच्या आजुबाजुला असलेले विनोद नारनवरे, आनंदराव नारनवरे, बंडू खंडू झाडे व राहुल भगवान झाडे यांच्या घरालाही आगीने वेढले. त्यांच्याही घरातील धान्य, सामान, कपडे आदी सामान जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती मिळताच, गावकर्यांसह विरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वप्रथम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. आगीतून बचावलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू व सिलिंडर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, गावकर्यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथील अग्नीशमन दलांना पाचारण करण्यात आले. आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीने पाचजणांचा संसार उघड्यावर आला.लोकप्रतिनिधींनी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र तो निधी कधी मिळेल, याची शाश्वती नाही. विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र ताकसांडे, श्रीनिवास इलंदुला, तिरूपती नल्लाला, संतोष ढवस, गुलाब ताकसांडे, रवींद्र चांदेकर, भुपेंद्र बोंडे, विशाल उपरे, शाहु नारनवरे व गावकर्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली. त्या रकमेतून कपडे, भांडे, आलमारी, पंखा व जीवनावश्यक वस्तु खरेदी करून दिल्या. तसेच गावकर्यांनी तांदूळ, गहू, दाळ आदि धान्य गोळा करून अपघातग्रस्तांना दिले. त्यामुळे आगग्रस्तांना दिलासा मिळाला. (वार्ताहर)
बेघर झालेल्या कुटुंबाला दिला मदतीचा हात
By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST