साईनाथ कुचनकार - चंद्रपूरमिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतील अर्ध्या डझनवर सदस्यांना सध्या विधानसभा उमेदवारीचे डोहाळे लागले आहे. यासाठी काहींनी चक्क दिल्ली गाठली असून काही सदस्य मुंबईत मुक्कामाला आहे. येथील काही सदस्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तर काहींना भाजपाची विधानसभेची उमेदवारी हवी आहे. एवढेच नाही तर यातील काहींनी अपक्ष निवडणूक लढविण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे यावेळी राजकीय पक्षांचे गणित चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.माढेळी-नागरी जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले कांँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.विजय देवतळे यांना वरोरा विधानसभेची काँगेसची उमेदवारी हवी आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तर, अगदी शेवटी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी सध्या दिल्ली गाठली आहे. कोणत्याही प्रकारे उमेदवारी मिळवायचीच याच तयारीने ेत्यांनी दिल्लीतील दरवाजे ठोठावणे सुरु केले आहे.नागभीड तालुक्यातील वाढोणा गिरगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनाही विधानसभेत पोहचायचे आहे. ते आणि त्यांचे बंधु अविनाश वारजुकर दोघेही कामी लागले आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूकीची लगबग असतानाच आणि बहुतांश सदस्य देवदर्शनाला गेले असतानाही त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. सावली तालुक्यातील बोथली जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले आणि सध्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले संदीप गड्डमवार यांना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पाहिजे आहे. यासाठी त्यांनी मुंबई गाठली आहे. वेळप्रसंगी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे.नांदगाव-बेंबाळ जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेतील प्रत्येक फाईलची माहिती ठेवणारे विनोद अहिरकर यांनाही मुंबई जवळ करायची आहे. पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी आहे. यासाठी त्यांनी बल्लारपूर विधानसक्षा क्षेत्राची निवडही केली आहे.पंचायत समिती सदस्य, सभापती ते जिल्हा परिषद सदस्य अशी एक एकपायरी वर चढत असलेले भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आणि नकोडा-मारडा जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले ब्रिजभूषण पाझारेही संधीच्या शोधात आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर ते आहे. सध्या ते भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन सहलीला गेले असले तरी त्यांचे लक्ष येथील उमेदवारीवर आहे. ब्रह्मपुरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य राजेश कांबळे यांनाही चंद्रपुरातून काँग्रेसची तर गोंडपिपरी क्षेत्रातून निवडून आलेले शिवसेनेचे संदीप करपे यांनाही विधानसभेची निवडणूक लढवायची आहे.या शर्यतीत आजीसोबत माजीही सदस्य गुंतले आहेत. माजी जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनाही बल्लारपुरातून काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.
अर्ध्या डझनवर जि.प. सदस्य विधानसभेच्या वाटेवर
By admin | Updated: September 17, 2014 23:41 IST