गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर.एस. गजबे व सरपंच प्रभा डोंगरवार यांनी ग्रामपंचायती अंतर्गत कोणतेही काम न करता गेल्या दोन वर्षात विविध योजनांमधून जवळपास पाच लाख ४० हजाराहून अधिक रुपयाचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने उपसरपंच राकेश सुरपाम यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी सदस्य विनोद सोनवाणे, विकास कुमरे, गंगाधर कुमरे उपस्थित होते. याबाबत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपसरपंच राकेश सुरपाम यांनी सांगितले, ग्रामसेवक गजबे यांनी एप्रिल २०१३ मध्ये किटाळी ग्रामपंचायतीचा कारभार हातात घेतला. तेव्हापासून ते आतापर्यंत मासीक सभा व ग्रामसभांची कोणतीही कारवाई लिहिली नाही. रेकार्डबाबत ग्रामसेवकाला अनेकदा विचारणा करण्यात आली. मात्र रेकार्ड पंचायत समिती अथवा घरी असल्याचे सांगत राहिले. दरम्यान ग्रामसेवक गजबे १ जुलै २०१४ ला प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर ग्राम पंचायतीचा तात्पुरता प्रभार भुजचे ग्रामसेवक नागूलवार यांच्याकडे देण्यात आला. ग्रामसेवक नागूलवार यांनी प्रभार स्विकारताच ग्रामसेवक गजबे यांनी दीड वर्षात केलेला सर्व गैरप्रकार उघडकीस आला.ग्रामसेवक गजबे यांनी कोणतेही काम न करता १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ९ एप्रिल ते ३१ जानेवारी २०१४ पर्यंत तीन लाख सात हजार रुपयाची उचल केली आहे. यातील काही धनादेश विश्वेशवर बोरकर व विनोद घोडमोरे नामक इसमाच्या नावाने आहेत. यानंतर किटकबोद्रा गावातील यादव मेश्राम ते राकेश सुरपाम यांच्या घरापर्यंत सिमेंंट रस्त्याचे काम केवळ कागदावर दाखवून मागास क्षेत्र अनुदान निधीतून एक लाख ४९ हजार रुपयाची उचल केली. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीचा प्रभाग ग्रामसेवक नागूलवार यांच्याकडे असताना सुद्धा गजबे यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीतून चार हजार रुपये व १३ व्या वित्त आयोगातून ८ आॅगस्ट २०१४ ला १६ हजार ५०० रुपयाची उचल केली. सरपंचाच्या संगनमताने ग्रामसेवक गजबे यांनी सर्व गैरप्रकार केल्याचे उपसरपंच यांनी म्हटले आहे. सरपंच व ग्रामसेवकाच्या गैरप्रकाराबाबत ११ आॅगस्ट २०१४ ला संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे तक्रार करुन किटाळी ग्रामपंचायतीच्या बँक खात्याची सर्व देवाण-घेवाण बंद करण्याची विनंती करण्यात आली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाईसाठी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचेही उपसरपंच सुरपाम यांनी सांगितले. (वार्ताहर)
ग्रामसेवकाने केला पाच लाखांचा अपहार
By admin | Updated: September 9, 2014 23:22 IST