देवाडाखुर्द : तालुका मुख्यालयाचे ठिकाणी असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा विविध मुद्यावर गाजली. दारु दुकान बंद करण्याच्या महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामसभा पार पडली. महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीला सिंचनाची व रस्त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक व सार्वजनिक हितासाठी लाभार्थ्यांना सिंचन विहीरी, शेततळे, शेतबोळी, शेतात जाणारे रस्ते व बंधारे अशा अनेक लाभाच्या योजनेची माहिती तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने पोंभुर्णा ग्रामपंचायतीमध्ये दुपारी १२ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. यामध्ये गावातील २५० महिला-पुरुष उपस्थित होते. सर्वप्रथम सभेमध्ये उपस्थित असलेल्या महिलांनी दारूबंदीवर हल्ला चढविला. वस्तीमध्ये देशी दारूचे दोन दुकान असून ते बंद करण्यात यावे. याबाबत ठरावात नोंद करण्याची मागणी केली. परंतु त्यांच्या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीधरसिंह बैस यांनी मागील सभेमधील विषयांचा वाचन न करताच सभेला सुरुवात केली. याबाबत त्यांनी उपस्थित काही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सदर ग्रामसभा अनाधिकृत असल्याबाबत आक्षेप नोंदविला. ग्रामपंचायत अंतर्गत स्पिकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या गोंगाटामुळे विषयाची बरोबर माहिती मिळत नव्हती. ग्रामसभेमध्ये उपस्थित लोकांच्या गोंगाटाने विषयाचे गांभीर्य समजणे कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांना पाचारन करण्यात आले. अखेर पोलिसांनी उपस्थित नागरिकांना शांत केले. यानंतर मागील वर्षी झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करुन रोजगार सेवकांना कामावरुन कमी करण्यात यावे, अशी मागणी येथील माजी सरपंच ओमेश्वर पद्मगिरीवार, बंडू बुरांडे, नरेंद्र धोडरे, आशिष कावटवार, किशोर गुज्जनवार, लालाजी उराडे आदींनी केली. तर उपस्थित काही महिलांनी गावामध्ये असलेल्या नाल्यांचा उपसा योग्य न झाल्याने वस्तीमध्ये अनेक प्रकारच्या डासांची उत्पती वाढत असून विविध आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तविली. या अनुषंगाने गावातील सुविधांकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच मुबलक पाणी असताना सुद्धा नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप काही महिलांनी यावेळी केला. ग्रामपंचायतीने गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कंत्राट घेत असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होत असून कामे दर्जाहीन झाली आहेत. त्यामुळे कोणतेही काम टेंडर काढून नोंदणीकृत कंत्राटदारामार्फत देण्यात यावे याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या प्रश्नाने ही सभा चांगलीच गाजली. उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी शेंडे व सरपंच लक्ष्मण कोडाप यांची मात्र दमछाक झाली. (वार्ताहर)
पोलीस बंदोबस्तात पार पडली पोंभुर्ण्याची ग्रामसभा
By admin | Updated: August 17, 2014 23:05 IST