गावागावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा ज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:55 AM2019-06-12T00:55:53+5:302019-06-12T00:57:39+5:30

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक तर काही ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असतानाच निवडणूक आल्याने गावागावांत चर्चांना उधान आले आहे.

Gram panchayat bye-election fever in village panchayat | गावागावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा ज्वर

गावागावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा ज्वर

Next
ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यात ४१ उमेदवार रिंंगणात : सहा उमेदवारांची अविरोध निवड, गावागावात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यात काही ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक तर काही ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असतानाच निवडणूक आल्याने गावागावांत चर्चांना उधान आले आहे.
काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूक तसेच सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
बल्लारपूर ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणुकीतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी तहसील कार्यालयात शुक्रवारी पार पडली. लावारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत २० तर दहेली ग्रामपंचायतमध्ये १६ आणि गिलबिली येथे दोन, विसापूर येथील प्रभाग चार मध्ये तीन असे एकूण ४१ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले आहे.
पळसगाव दोन, विसापूर एक, कोर्टिमक्ता एक, गिलबिली व लावारी येथील ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी एक असे एकूण सहा उमेदवारांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
अविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांत विसापूर येथील प्रभाग सहा मधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर प्रियंका लक्ष्मन सोरी, पळसगाव येथील प्रभाग एक अ जागेवर बंडू परचाके, ब जागेवर माधुरी कोडापे, गिलबिली प्रभागातील अ जागेवर दादाजी गेडाम तर कोर्टिमक्ता येथील प्रभाग तीन अ जागेवर नवनाथ टेकाम यांनी पोटनिवडणुकीत तर लावारी येथील प्रभाग तीन ब जागेवर सुनिता निलकंठ राजूरकर यांनी सार्वत्रिक निवडणुकीत अविरोध विजय मिळविला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील लावारी ग्रामपंचायतमध्ये ९०४ मतदार आहेत. येथील मतदार थेट सरपंच मतदानातून निवडणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव सरपंच पदासाठी योगेश पोतराजे, उमेश वाढई, वैशाली भोयर व योगेश डाहुले रिंगणात आहेत. येथे सरपंच पदासह सहा ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
दहेली ग्रामपंचायत मध्ये एकूण ९२७ मतदार असून सर्वसाधारण महिला राखीव सरपंच पदासाठी सुरेखा खजांजी देरकर व कलावती ताराचंद वाढई यांच्यात थेट लढत आहे. येथील प्रभाग एक अ मध्ये कौशल्या काटोले व अक्षय देरकर, ब मध्ये शोभा पेटकर व नंदा गायकवाड, प्रभाग दोन अ मध्ये सरपंच ज्ञानेश्वर टेकाम व संतोष मडावी, ब मध्ये सूवर्णा देरकर व अश्विनी ठावरी तर प्रभाग तीन अ जागेवर उपसरपंच रमेश मोहितकर व सुधाकर कामतवार, ब जागेवर पुष्पा टेकाम व शंकुतला तुमराम तर क जागेवर सुषमा उरकुडे व जया भोयर यांच्यात सदस्य पदासाठी दुहेरी लढत आहे.
२३ जून रोजी निवडणूक पार पडणार असून त्यानंतर लगेच निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पेरणीच्या तोंडावरच हि निवडणूक पार पडणार असल्याने गावांतील अनेकांचा राजकीय हिरमोड होत आहे.

शेती हंगामात उमेदवारांची दमछाक
ऐन खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर ग्रामपंचायत निवणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे. शेती कामे करून निवडणूक प्रचार करावा लागत असल्याने उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणुकी चिन्ह मिळताच रणधुमाडी सुरु झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील लावारी येथे तीन तर दहेली येथील ग्रामपंचायतमध्ये दोन आघाड्यात लढत होत आहे.
आमडी व गिलबिली पोटनिवडणुकीसाठी अर्जच नाही
आमडी ग्रामपंचायतमध्ये प्रभाग दोन मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर व गिलबिली येथील प्रभाग एक मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र एकाही उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल न केल्यामुळे जागा रिक्त राहणार आहे. विशेष म्हणजे, गिलबिली येथील प्रभाग तीन या जागेसाठी श्रीपत डोनु बुरांडे व अभिमन्यू शेंडे पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नशिब आजमावीत आहेत.
गोंडपिपरीत पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी थेट लढत
गोंडपिपरी : तालुक्यात ५० ग्रामपंचायतीचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात पहिल्या टप्यातील ७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. २३ तारखेला मतदान होणार आहे. यासाठी नामनिर्देशन आणि उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया आटोपल्या आहे. गोंडपिपरी तालुक्यातील ७ पैकी २ ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध निवडून आले. तालुक्यात पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवडल्या जाणार आहेत. यामुळे तालुक्यातील उर्वरित ४३ ग्रामपंचायतीसाठी हा अनुभव नवीन आहे. गोंडपिपरी तालुक्यात एका नगरपंचायतीसह ५० ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यात घडोली, नांदगाव, चेकदूबारपेठ, गोजोली मक्ता, कन्हाळगांव, कुडेसावली आणि परसोडी अशा एकूण सात ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या गावाच्या ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत आहे. ७ पैकी गोजोली मक्ता व नांदगाव येथील सरपंच म्हणून छाननीअखेर अनुक्रमे गिरीधर कोटनाके व शैला शालीग्राम अवथरे यांची अविरोध निवड झाली आहे. यानंतर या दोन्ही गावात आता केवळ सदस्यपदासाठीच मतदान होणार आहे. निवडणूक होणाºया या ग्रामपंचायतीत प्रत्येकी ३ प्रभाग असून, यापैकी गोजोली मक्ता गावात केवळ एकाच प्रभागात एकमेव सदस्यासाठी मतदान होणार आहे. नांदगावात प्रभागनिहाय निवडीचा सामना रंगणार आहे. चेकदुबारपेठ गावात सरपंचपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असून, ४ उमेदवार रिंगणात आहेत. ३ सदस्य अविरोध तर इतरांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरल्याने चार सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहेत. कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत ६ उमेदवार सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत. याठिकाणी देखील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. नामाप्रसाठी सरपंचपदाची सोडत असलेल्या परसोडी गावात २ उमेदवार आहे. सर्वसाधारण प्रवगार्साठी सरपंच आरक्षित असलेल्या कुडेसावली ग्रा.पं.अंतर्गत २ उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्यासाठी प्रभागातून उमेदवार विजयाकरिता प्रयत्नशील आहेत. सरपंचाचे नामाप्र आरक्षण असलेल्या घडोली येथील ४ उमेदवारांनी कंबर कसली असून, याच गावात प्रभागनिहाय उमेदवारांनी आव्हान कायम ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेपूर्वी ७ ग्रामपंचायतीची ही थेट सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. पुढीलवर्षी तालुक्यात होणाºया ४३ ग्रामपंचायतीच्या गावपुढाऱ्यांना सदर निवडणुकीचा निश्चितच फायदा होणार आहे.

Web Title: Gram panchayat bye-election fever in village panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.