लोकसहभाग वाढविणार : जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्णलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. ना. मुनगंटीवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनानेही वृक्ष लागवडीसाठी जय्यत तयारी करून ठेवली आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत होणाऱ्या या वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे. जिल्हा प्रशासन यंदा ३४ लाख ३० हजार वृक्ष लागवड करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.मागील वर्षी राज्यात २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड झाली. यावर्षी चार कोटीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या वर्षीच्या चार कोटी वृक्ष लागवडीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला २९ लाख १७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रशासनाने यावेळी ३४ लाख ३० हजार वृक्ष लागवडीची तयारी केली असून यामध्ये वन विभाग १७.४३ लाख, सामाजिक वनीकरण एक लाख व वन विकास महामंडळ ८.८१ लाख, ग्रामपंचायत ४.१३ लाख व इतर यंत्रणा २.९३ लाख असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला असून केवळ सोपस्कार नव्हे तर यामागील त्यांच्या तळमळीचा सन्मान करण्यासाठी, पर्यावरण पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हयात १ ते ७ जुलै या काळातील वृक्ष लागवडीची चळवळ यशस्वी करा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीमार्फत सर्वसामान्य जनतेला केली आहे.मागील वर्षी ज्या शासकीय यंत्रणेने वृक्ष लागवडीची मोहीम राबविली होती. त्यांनी ९१ टक्के वृक्ष संगोपन केले आहे. ही आकडेवारी जानेवारी महिन्यापर्यंतची आहे. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण व वन विकास महामंडळ यांचा समावेश आहे. मात्र शहर परिसर आणि दर्शनी ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून लावण्यात आलेल्या वृक्षांची अनेक ठिकाणी काळजी घेतली गेली नाही, असे दिसून येते. त्यामुळे वृक्ष लागवड करताना, या मोहिमेत सहभागी होताना केवळ वृक्षारोपण नव्हे वृक्षसंगोपनही आपले उद्दिष्ट ठेऊया, असे जिल्हाधिकारी सलिल यांनी स्पष्ट केले. वन विभाग, वन विकास महामंडळ, सामाजिक वनीकरण यांच्याकडून गेल्या वर्षी लावण्यात आलेले वृक्ष सुस्थितीत असून यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या वृक्ष लागवडीला वृक्षसंगोपनाची जबाबदारीची जोड दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी ही मोहीम वनसंपदा जगवण्याबद्दल सर्वसामान्यांना जागरुक करणारी असून सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन आपण लावलेले झाड जगवणे हेच उद्दिष्ट डोळयापुढे ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. रोपांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळामधून वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थी वृक्ष लावेल व त्याची जबाबदारी घेईल, असे नियोजन केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होईल, असेही स्पष्ट केले.विपुल रोपटे उपलब्धवृक्ष लागवड मोहिमेसाठी ८४ लाख रोपटे उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, अशा स्वस्त भावात रोपवाटिकेमध्ये ते उपलब्ध आहेत. १ ते ७ जुलै या काळात या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला रोप मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक कुटुंबाने किमान एक रोपटे लावून संगोपन करण्याची हमी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.एक कुटुंब, एक वृक्षआॅक्सीजन प्रत्येकाला हवे, वातावरण प्रत्येकाला चांगले हवे, पृथ्वीला हिरवेगार करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. दुष्काळ कोणालाच नको आहे. या परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण करणे केवळ शासनाचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे झाडे लावण्यानंतर किती जगली, खर्च किती झाला, याचे हिशेब करण्याऐवजी जिल्हयातील प्रत्येक कुटुंबाने यावर्षी सामाजिक कर्तव्यपूर्ण करीत पावसाळयात एक वृक्ष लावावा व त्याचे संगोपन करावे आणि या वसुंधरेच्या सेवेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले आहे.
जिल्ह्याला ३४.३० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
By admin | Updated: June 2, 2017 00:40 IST