लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : मिलियन स्टील कंपनीच्या प्रास्ताविक स्टील कारखान्याबाबत शुक्रवारी (दि. ३०) बेलसनी येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी झाली. सर्व मागण्या केल्या तरच उभारा स्टील प्रकल्प, असा इशारा नागरिकांनी दिला. दरम्यान, जनसुनावणीची कंपनीने माहिती दिली नाही, असा आरोपही काहींनी केला आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमाशंकर बहादुरे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील व बेलसनी, मुरसा, म्हातारदेवी, साखरवाही, घुग्घुस येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांना मोबदला, प्रदूषण झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, वर्धा नदीवर बंधारा बांधावा व प्रकल्पग्रस्त गावांत मूलभूत सोईसुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली. चार तास चाललेल्या जनसुनावणीत बेलसनी, मुरसा, म्हातारदेवी, साखरवाही व घुग्घुस परिसरातील नागरिक उपस्थित होते.
५० जणांनी मांडली भूमिकाजनसुनावणीत ५० व्यक्तींनी आपली मते मांडली. अधिकांश व्यक्तींनी कारखान्याचे प्रदूषण नियंत्रण, शेती, पिण्याचे पाणी, स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, शेतीचा योग्य मोबदला, हे प्रश्न आधी सोडवावे, अशी मागणी जोरकसपणे केली.