भद्रावती : येथील एका पक्षाच्या तालुका प्रमुखाने मद्यधुंद अवस्थेत कार्यरत असलेल्या वाहतूक शिपायास अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या शिपायाने या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यावरुन पोलिसांचा ताफा त्याला ताब्यात घेण्याकरिता गेला. परंतु या मद्यधुंद पदाधिकाऱ्यांने गोंधळ घालून कर्तव्यावर असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे शर्ट फाडले. ही घटना येथील पेट्रोल पंप चौकात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तालुका प्रमुख अभय खिरटकर (३७) हा मद्यधुंद अवस्थेत तहसील कार्यालयामधून पेट्रोल पंप चौकात आला. त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शंकर चौधरी यांना ‘तु मला ओळखत नाही का?’ मी या भागातील भारदस्त पदाधिकारी आहे. आमच्या भरवशावर तुझी ही वर्दी आहे. ही वर्दी मी एका झटक्यात उतरवू शकतो’ असे म्हणून अश्लील शब्दात शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावर चौधरी यांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु अतीमद्यप्राशन केल्यामुळे तो ऐकण्यााच्या मनस्थितील नव्हता. शेवटी चौधरी यांनी ही बाब ठाणेदार परघने यांना सांगितली. यावरुन त्याला ताब्यात घेण्याकरिता पाठविलेल्या पोलीस पथकालाही शिव्या देणे सुरु केले आणि ए.एस.आय. मित्तलवार यांच्यावर धावून जावून त्यांचे शर्ट फाडले. मोठ्या प्रयासाने शेवटी त्याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी सुद्धा त्याचा गोंंधळ सुरुच होता. अखेर ठाणेदारांनी वरोरा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जयस्वाल यांना पाचारण केले. उपविभागीय अधिकारी पोहचल्यानंतरही मोठ्या आवाजात पोलिसांना शिवीगाळ करणे सुरूच होते. अखेर पोलिसांनी आपला पोलीसी हिसका दाखवून त्याला कस्टडीत डांबले. त्याच्यावर वाहतूक पोलीस शंकर चौधरी यांच्या तक्रारीवरुन कलम ३५३, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
मद्यधुंद तालुका प्रमुखाचा भरचौकात गोंधळ
By admin | Updated: August 11, 2014 23:50 IST