मूल : मूल तालुका युवक बिरादरी संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्यावतीने शासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे कायमस्वरुपी पट्टे देण्याकरिता १९९८ मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. तत्पूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली. शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. परंतु अतिक्रमित शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर संघटनेला शासनाच्या विरोधात १९९८ याचिकरा दाखल करावी लागली. यायाचिकेवरील निकाल प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर १० जूनला संघटनेच्या बाजूने लागला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निकालात संघटनेच्या सभासदांना अतिक्रमित जमिनीचे पट्टे द्यावे, असे आदेश दिले. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यासंबंधात व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत युवक बिरादरी संघटनेच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप, युवक बिरादरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कवडू येनप्रेड्डीवार, रमेश सावकार दंंडमवार, रुपेश येनप्रेड्डीवार, नितेश येनप्रेड्डीवार, ओमदेव मोहुर्ले यांनी करुन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्याना देण्यात आले. अतिक्रमित शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर पट्टे देण्यात यावे, अतिक्रमित शेतकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा तसेच सरकारी योजनांंचा लाभ देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विवेक मांदाडे, मधू चिंचोेलकर, नामदेव कोटनाके, देवराव धुर्वे, बंडू वानखेडे, मुकुंद खोडपे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
युवक बिरादरीचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: August 12, 2014 23:41 IST