गोवरी येथे जळालेल्यांचा कणवाळू : घरी दारिद्र्य तरीही सामाजिक बांधिलकी प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : स्वार्थाने बरबटलेल्या समाजात सेवाभाव जोपासणारी माणसे अगदी विरळ आहेत. मी आणि माझा परिवार, यापुढे माणसे जायला धजावत नाही. मात्र समाजात अशीही काही सेवाभावी माणसे आहेत, जी आपल्या जिवाचे रान करीत समाजासाठी धडपड करीत असतात. गेल्या ४० वर्षांपासून समाजासाठी झटणारा हा वयोवृद्ध अनेकांच्या आयुष्यात दीप प्रकाशमान करणारा ठरला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील दत्तुजी जमदाडे (७०) असे या सेवाभाव जोपासणाऱ्या वयोवृद्धाचे नाव आहे. समाजात सेवाभाव जोपासणारी माणसं कमी आहेत. मात्र घरी अठराविश्वे दारिद्र्य असूनही आपलही समाजासाठी काही देणे असावे या एकाच उदात्त हेतूने ते जळलेल्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार करतात. जळालेली त्वचा पूर्णवत आणण्यात त्यांचा मोठा हातगंडा आहे. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात. हे त्यांचे अविरत कार्य गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. चंद्रपुरातील नामांकित डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी बोलावले. चांगला पगार देतो त्यांची भेटही घेतली. परंतु, समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या धेयवेड्या माणसाने सामाजिक बांधिलकी जोपासत सारे काही गौण ठरविले. सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवा करणे हेच त्यांचे काम आजही अविरत सुरू आहे. धावपळीच्या जगात आज कुणाकडेच वेळ नाही. समाजाचे देण लागतो या आशेपोटी ते जळालेल्या रुग्णांवर आजही नि:शुल्क उपचार करीत आहेत. अंधारलेल्या आयुष्यात फुलविला प्रकाश जळाल्याने अनेकांच्या आयुष्यात नैराश्य येते. त्यामुळे ते उदासीन जीवन जगत असतात. मात्र गेल्या ४० वर्षांच्या काळात दत्तुजी जमदाडे या कफल्लक माणसाने जळालेली त्वचा पूर्ववत करून अनेकांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाचा दीप फुलविला आहे.
४० वर्षांपासून ‘ते’ करतात रुग्णांवर नि:शुल्क उपचार
By admin | Updated: June 19, 2017 00:48 IST