लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न करणाऱ्यांचा लाभ आता बंद करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ३५० लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाने सुरू केल्या आहेत. सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
जे लाभार्थी धान्याची उचल करत नाहीत, अशा लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षीच निर्देश दिले होते. यानुसार, दर महिन्याला मागील सहा महिन्यांत धान्य उचल न करणाऱ्यांची यादी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात येते. जिल्ह्यातील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी मागील सहा महिन्यांत धान्य घेतलेले नव्हते त्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांचीही समावेश आहे.
लाभ बंद करण्याचा नियमधान्य न घेणारे रेशन कार्ड लाभार्थी सायलेन्ट समजून त्या रेशनधारकांची पडताळणी करण्यात येत आहे, असे लाभार्थी एपीएल (बिगर प्राधान्य कुटुंब लाभार्थी) योजनेत वर्ग केले जातात. सहा महिने धान्य न घेतलेल्या रेशन दुकानातील धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचा धान्याचा हक्क बंद होतो, असा नियम आहे.
५ हजार१२ रेशन कार्डमधील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. संपूर्ण लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर धान्य बंद करण्यात येणार आहे.
"पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारामार्फत मागील सहा महिन्यांपासून धान्याची उचल न करणाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. ५ हजार १२ कार्डच्या १२ हजार ३५० लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे."- आर. आर. बहादूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर