चिमूर : वाघांच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाºया पर्यटकांना आॅनलाईन बुकिंग व स्पॉट बुकिंगद्वारे ताडोबात प्रवेश दिला जातो. मात्र, चिमूर तालुक्यातील नवेगाव येथील ताडोबा कोअरच्या प्रवेशद्वारातून चक्क वनरक्षक आणि एका खासगी दलालाने वाहनचालकाकडून पैसे घेऊन ताडोबात अनधिकृत प्रवेश देत असल्याचे खळबळजनक प्रकरण नुकतेच उजेडात आले होते. या प्रकरणात वनरक्षक आणि एका दलालावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात वनविभागाच्या चौकशीमध्ये वनरक्षक टेकचंद रुपचंद सोनुले दोषी आढळून आल्याने त्याला वनविभागाच्या सेवेतून ९ डिसेंबरपासून निलंबित करण्यात आले आहे.
१ डिसेंबरला ताडोबा क्षेत्र संचालक यांच्या मार्गदर्शनात ताडोबा कोअरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी राबविलेल्या आॅपरेशनमध्ये एका पर्यटकाच्या पडताळणीत हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा कोअर सतीश शेंडे यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद सोनुले व खासगी एजंट सचिन संतोष कोयचाडे रा. खडसंगी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात दोन्ही आरोपींना चार दिवसांचा पीसीआर आणि चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
बनावट बुकींगद्वारे हे दोघेही पर्यटकांना ताडोबात प्रवेश देत होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा गोरखधंदा सुरू होता. लाखोची माया या बनावट बुकींगमधून त्यांनी जमविली आहे. दरम्यान, वनविभागाच्या चौकशीत दिलेल्या अहवालानुसार वनरक्षक सोनुले यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे वनरक्षक सोनुले यांना ९ डिसेंबरपासून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत वनरक्षक सोनुले नवेगाव गेट (वन्यजीव) कोलारा परिक्षेत्र यांचे मुख्यालय वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ताडोबास्थित वडाळा येथे राहणार आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. सदर कारवाई ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) त्यांनी केली.