चिमण्यांचा चिवचिवाट गायब : वन्यप्राण्यांचा मृत्यू, पाण्यासाठी भटकंती बी. यू. बोर्डेवार। लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : उन्हाळ्यातील वाढत्या भीषण तापमानामुळे मानवासह पशूंचाही जीव धोक्यात आला आहे. एकीकडे उष्माघाताने मृत्यू होत आहेत. त्याच वेळी उन्ह लागून वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. भीषण गरमी सामना जनावरांना करावा लागत आहे. चिमण्या, पाखरे, कावळे आदी पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या गरमीने जनावरांना त्राही भगवान करून सोडले आहे. पाळीव जनावरे, मोकाट जनावरे रस्त्यावर वाहणारे पाणीदेखील पित आहेत. राजुरा तालुक्याच्या ग्रामीण भागात हेच चित्र दिसत आहे. रस्त्यावर सोडलेले पाणीही पशूंसाठी वरदान ठरत आहे. जंगलातही पाणवठे आटले असल्याने पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. जंगलामध्ये पाणी नसल्याने प्राणी नागरी वस्तीच्या दिशेने धाव घेत आहेत. सोमवारी सकाळी एक चितळ पाण्यासाठी वणवण भटकले. रस्त्यावर आले तरी त्याला पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाला. तसेच सकाळी गावात चिवचिव करणाऱ्या चिमण्या व पाखरांचा आवाज थांबला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी तापमानाने कहर केला आहे. चंद्रपूरचा पारा ४६.८ अंशापर्यंत गेला आहे. या तापमानात शेतकरी बैलांना जपण्यासाठी त्यांच्या अंगावर पाणी शिंपडत आहेत. तसेच सायंकाळी गाई-बैल झाडाखाली निवांत बसलेले असतात. मनुष्याची काळजी घेतली जाते. त्याप्रमाणे पशूंचीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
भीषण तापमानाचा पशू-पक्षांना फटका
By admin | Updated: May 24, 2017 02:09 IST