चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, नागभीड, आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने धानाचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ऐन धान कापणीच्या वेळी धानाला विविध रोगांची लागण झाली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने दोन ते तीनदा फवारणी केली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मळणीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन घटत आहे. ज्या एक एकरामध्ये २० च्या जवळपास धानाच्या पोते व्हायचे, तेथे केवळ सात ते आठ पोते धान होत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. पूर्वी शेतकरी विविध संकटांत सापडला असल्याने त्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. आता पुन्हा उत्पादन घटल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
बॉक्स
चुकारा मिळण्यास विलंब
ज्या शेतकऱ्यांची धानमळणी झाली आहे, त्यांनी शासनाच्या केंद्रावर विक्री करण्यासाठी धान टाकले आहे. मात्र तेथे धानाचा लिलाव होऊन चुकारा मिळण्यास बराच विलंब लागतो. याउलट खासगी व्यापारी त्वरित पैसे देत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्याकडे धानाची विक्री करीत आहेत. मात्र त्यांना प्रतिक्विंटलमागे पाचशे ते सहाशे रुपयांचे नुकसान होत आहे.