अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त
घुग्घुस : घुग्घुस शहरात अनेक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासकाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वीज भरले नसल्याने नळ योजना बंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावात नळ योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे तर काही गावांमध्ये वीज बिल भरले नसल्याने या नळ योजना बंद पडल्या आहे. ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या नळ योजना सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त
चंद्रपूर : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते, पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहकवर्ग त्रस्त झाला आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने मोबाईलचा वापर वाढला आहे.
मुद्रा योजनेची जनजागृती करावी
चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगांरासह उद्योजक होण्याची आशा बाळगून असलेल्या हजारो व्यक्तींच्या हाताला हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा बँक योजना सुरू करण्यात आली आहे. या बँकेचा अधिकाधिक युवकांना फायदा होण्यासाठी या योजनेची व्यापक जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, कोरोना संकटामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे जनजागृती करून या योजनेचा अधिकाधिक नागरिकांना फायदा करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
दुचाकी वाहनांचा लिलाव करा
चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र अनेक वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेली नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली असून काहींचे सुटेभाग बेपत्ता झाले आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडेल.
रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराचा अडथळा
पडोली : चंद्रपूर-वणी मार्गावर बुधवारी बाजार भरतो. या मार्गानी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय रस्त्यावर तुडुंब गर्दी असल्याने वाहनधारकांना त्रास होतो. बाजाराच्या दिवशी रस्त्यावर दुतर्फा दुकाने लावली जातात. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
बेरोजगार युवक-युवतींमध्ये निराशा
सावली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी द्वितीय किंवा तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर बंदी घातली तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.
बसस्थानक रस्त्याचे रुंदीकरण करावे
गडचांदूर : नांदा गावालगत उद्योग असल्याने दरवर्षी वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. बसस्थानक परिसरातील रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास नागरिकांची त्रेधातिरपीट उडते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो. रस्त्यांचे रुंदीकरणाची मागणी आहे.
चंद्रपूर शहरात अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : येथील बाबूपेठ, लालपेठ, नगिनाबाग परिसरातील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
भूमिअभिलेखची रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. पदे भरण्यात आल्यास कामाला गती मिळेल.