वरोरा : शासनाने सिंचन व्यवस्था करण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी एका नोटीसद्वारे गोंडपिपरीच्या उपविभागीय कार्यालयात बोलावले आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी शंभर किलोमिटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांना या नोटीसबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.वरोरा तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनीची कालव्यासाठी सन २००५-०६ मध्ये शासनाच्यावतीने निवड करण्यात आली. कालव्यात जाणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या विशेष भुसंपादन कार्यालयाने दरही निश्चित करून शेतातील सीमा निश्चित केली. कालवा शेतातून जात असल्याने शेताचे दोन तुकडे पडतात, तर काही शेतात निम्यापेक्षा अधिक भाग कालव्यात गेल्याने ती शेती कसण्यायोग्य राहणार नाही. दोन तुकडे वाहितीमध्ये कसे आणावे, असा प्रश्न निर्माण झाला. मिळणारे अनुदानही आजच्या तुलनेत कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांची अनुदानाची उचल केली नाही. गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवून भुसंपादनाचा निवाडा पारित केला. भुसंपादन कायदा कलम १२/२७ या नोटीसद्वारे तुम्हास तुमच्या मालकी हक्काच्या संपादीत जमिनीचा मोबदला उचलण्यासाठी कळविण्यात आले; परंतु रक्कम उचल केली नाही. त्यामुळे नमुद तारखेला उपविभागीय अधिकारी तथा विशेष भुसंपादन अधिकारी गोंडपिपरी कार्यालयात उपस्थित रहावे. रक्कम उचलण्यासाठी उपस्थित न झाल्यास सदर रक्कम शासन जमा करण्यात येईल आणि शासनाकडून एकतर्फी ताबा घेण्यात येईल. यानंतर आपला कोणताही उजर राहणार नाही, असेही नोटीसमध्ये नमुद केले आहे. वरोरा येथील उपविभागीय कार्यालय किंवा चंद्रपूर शहरात वरिष्ठ कार्यालय असताना मोबदल्यासाठी गोंडपिपरी येथे बोलाविण्यात आल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.(तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यातील शेतकऱ्यांना गोंडपिपरीतून मोबदला
By admin | Updated: October 12, 2014 23:42 IST