पालकमंत्री : मेक इन चंद्रपूरचा प्रारंभचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील वनऔषधी, हळद, शिंगाडा, मशरुम व तांदूळ यासारख्या कृषी उत्पादनाचे ब्रँड मुंबई, दिल्लीच्या बाजार पेठेत मिळावे, कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचावे, असे सांगून कृषी विकासाच्या माध्यमातून आज मेक इन चंद्रपूरचा प्रारंभ झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे आज बुधवारी अयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, पंकज पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनबादे व आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी विभागाने तयार केलेल्या हळद उत्पादन लोगोचे विमोचन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, दिल्लीच्या बाजार पेठेत चंद्रपूरच्या उत्पादनांना मोठया प्रमाणात मागणी व्हावी, या दृष्टीने कृषी विभागाने योजना आखाव्यात, असे मुनगंटीवार म्हणाले. आपल्या जिल्हयाच्या योजना महाराष्ट्रात यशस्वी व्हाव्यात यासाठी टिम चंद्रपूर म्हणून काम करु अशी ग्वाही त्यांनी दिली. पारंपारिक पिकासोबतच प्रयोगशिल शेती केल्यास उत्पन्न निश्चित वाढेल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकाच्या पध्दती व नवीन प्रयोग समजून घ्यावे, असे त्या म्हणाल्या. उत्पनावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेती अडचणीत असल्याचे सांगून कारवरील सबसिडी कमी करुन ट्रॅक्टरला देण्यात यावी असे आमदार नाना श्यामकुळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विद्या मानकर यांनी केले. या कार्यक्रमात आत्महत्या केलेले शेतकरी सुरेश गिरसावळे यांच्या पत्नी नंदा गिरसावळे यांना पालकमंत्री यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा
By admin | Updated: February 5, 2015 23:07 IST