मोठ्या प्रमाणावर मासे मेल्याने तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तीन-चार दिवस भयंकर दुर्गंधीचा सामना करावा लागला. घराचे दार उघडताच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. आधीच कोरोना विषाणूचे संकट आणि त्यातच मृत पावलेल्या मासोळ्या यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली होती. प्रसार माध्यमांनी सातत्याने सदर प्रकरण लावून धरले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कार्यवाहीला गती मिळाली. सर्वप्रथम ब्रम्हपुरी न. प. चे गटनेते विलास विखार यांनी सदर तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर तलाव त्वरित स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार न प चे सफाई कामगार तलाव स्वच्छ करण्यासाठी कामाला लागले. परंतु सफाई कामगारांची संख्या कमी आणि मृत मासोळ्यांचे प्रमाण अधिक त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली. त्यांनतर ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी तलावाची पाहणी करून शक्य तेवढ्या लवकर तलावातील मृत मासोळ्या कशाप्रकारे बाहेर काढता येतील, याची खात्री करून ब्रम्हपुरी पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविनिमय करून न.प.ची यंत्रणा तात्काळ कामाला लावली. तसेच शहरातील सर्व भोई समाजाच्या लोकांना सदर तलाव लवकरात लवकर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार मासोळ्या लवकरात लवकर तलावाच्या बाहेर काढणे शक्य झाले आणि तलाव दुर्गंधीमुक्त झाला.
अखेर ब्रम्हपुरीचे लेंडारी तलाव झाले दुर्गंधीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST