चंद्रपूर : चार भिंतीतल्या पुस्तकी ज्ञानाशिवाय सुप्त कलागुणांना वाव देवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासोबतच अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास साधता यावा. हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यापीठ दरवर्षी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करीत असते, असे मत प्राचार्य डॉ. सरताज बानो काझी यांनी व्यक्त केले.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली आदि मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजश्री मार्कंडेयवार यांनी केले. डॉ. प्रफुल्ल वैराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.चार दिवस चाललेल्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेंतर्गत लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य स्पर्धा, शास्त्रीय व सुगम संगीत, समुह गीत स्पर्धा, शास्त्रीय ताल वाद्य, ताण वाद्य, पाश्चात्य एकल व समुह गायन स्पर्धा, लघु नाटिका, मूक नाटिका, मिमिक्री नाटक, चित्रकला, हस्तकला, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अभिनय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, कोलॉज मेकिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या बहुसंख्या महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. लोकनृत्य स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचा रोहित गाडगे व संचाने प्रथम तर गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाचा स्वप्नील कुसराम व संचाने द्वितीय क्रमांक पटकाविला. सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील नितेश पुरुषोत्तम मडावी व संचाला तृतिय क्रमांकावर समाधान मानावे लागले. शास्त्रीय नृत्य स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरची विद्यार्थिनी भाग्यश्री तांबोळी प्रथम, एफ.ई.एस. गर्ल्स कालेज चंद्रपूरची पूजा मडावी द्वितीय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीची सुमित्रा प्रधाने तृतिय क्रमांकाची मानकरी ठरली. शास्त्रीय संगीतात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचा प्रणय गोमासे प्रथम तर एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपूरची प्रिया फुलझेले द्वितीय आली. सुगम संगीतात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरची चमू तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरली. समुह गीत, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय ताण वाद्य, पाश्चात्य एकल गाल व पाश्चात्य समुह गायन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर अव्वल क्रमांकावर राहिले.राष्ट्रीय एकात्मता या विषयावर संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तळोधी येथील गोविंदप्रभू महाविद्यालयाचा केनु चांदेकर याने प्रथम क्रमांक तर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरची सरला बलरू द्वितीय आणि सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील सिमा चहारे ही तृतिय क्रमांकाची मानकरी ठरली.आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा २०१४ अंतर्गत संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत विजेते ठरलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले, आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. चंद्रमौली, डॉ. शिवदास इंदोरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिवाकर काटपल्लीवार, सहभागी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा. सगानंद बागडे यांनी केले.प्रा. देव वताखेरे यांनी आभार मानले. आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेचे परिक्षक म्हणून हिरालाल पेंटर, प्रा. रत्नाकर बोमीडवार, प्रा. किशोर ओल्लारवार, भालचंद्र गुरुजी, अश्विनी खोब्रागडे, संतोष बारसागडे, डॉ. बी.एम. कऱ्हाडे, राजेश कैतवार, डॉ. फारुख शेख, प्रा. श्वेता खर्चे, प्रा. विजय रुद्रकार, प्रवीण ठगे आदिंनी जबाबदारी सांभाळली. प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्रा. संदीप देशमुख, प्रा. विनोद बडवाईक, प्रा.प्रेरणा मोडक, डॉ. नीलिमा उमाटे, डॉ. अशोक खोबरागडे, प्रा. विजय पवार, प्रा. भास्कर सुकारे, प्रा. दिलीप सोनटक्के, प्रा. प्रशांत वासाडे, प्रा. दिवाकर उराडे आदिंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्पर्धांचे आयोजन - सरताज काझी
By admin | Updated: November 1, 2014 22:51 IST