शंकर चव्हाणआॅनलाईन लोकमतचंद्रपूर: पाणी हेच जीवन आहे. आपले आरोग्य सुदृढ व सक्षम ठेवण्यासाठी शुद्ध पाण्याचीही तेवढीच गरज आहे. एकीकडे शुद्ध पाणी म्हणून बाटली बंद पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तर दुसरीकडे मात्र स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. पहाडावरील अनेक गावात अशी स्थिती ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.खडकी रायपूर ग्रामपंचायतमधील खडकी, रायपूर, काकबन, लेंडीगुडा, मारोतीगुडा, कलीगुडा या आदिवासी कोलाम वस्तीला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयान वास्तव बघायला मिळाले. निजामकालीन ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खडकी गावात आदी ७०० घरांची वस्ती होती. केवळ गावात जायला रस्ता नसल्याने येथील बहुतांश कुटुंबे स्थलांतरित झाली. आजघडीला या कोलाम वस्तीत केवळ १७ घरांची वस्ती आहे. शेतीच्या आधारावर जगण्यासाठी जंगलाचा आधार घेत वस्ती थाटली. येथील नागरिकांपर्यंत शासनाच्या कुठल्याच सोईसुविधा पोहोल्या नाहीत. गावात जायला रस्ता नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत. खराब रस्त्यामुळे वाहन गावात जात नाही. अशा खडतर परिस्थितीत कोलाम बांधव पडक्या घरात आपले जीवन जगत आहे. घराला अजूनही द्वार नाही. मागील तीन वर्षांपूर्वी रायपूरवरून खडकी या कोलाम वस्तीला जाण्यासाठी लाखो रुपये खर्चुन रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले. परंतु काम थातूरमातूर झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन-तेरा वाजले. अधिकारी-पदाधिकारी गावात कधी येत नाही. ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकही कधी खडकी गावात फिरकला नाही. आमसभा कधी होते, याचा थांगपता लागत नाही. दुर्लक्षित असलेल्या कोलाम वस्तीत पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जलस्वराज्य प्रकल्पातर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. कंत्राटदार निकृष्ट साहित्याचा वापर करत बांधकाम करून मोकळे झाले. अल्पावधीतच विहिरीला तडे गेले. अनेक वेळा विहिरीची दुरूस्ती करण्यासाठी मागणी केली. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. कधी ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही. त्यामुळे खचलेल्या विहिरीतूनच जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते. या विहिरीचा काही नेम नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने डबक्यातील दूषित पाणी प्यावे लागते. असे डबके अनेक गावात पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून आढळतात. या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाणही अधिक आहे.
आजही डबक्यांमधल्या दूषित पाण्यावरच जगताहेत कोलामाच्या पिढ्या ! चंद्रपूर जिल्ह्यातले वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 11:38 IST
एकीकडे शुद्ध पाणी म्हणून बाटली बंद पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तर दुसरीकडे मात्र स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. पहाडावरील अनेक गावात अशी स्थिती ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.
आजही डबक्यांमधल्या दूषित पाण्यावरच जगताहेत कोलामाच्या पिढ्या ! चंद्रपूर जिल्ह्यातले वास्तव
ठळक मुद्देप्रशासनाकडून उपाययोजना नाही मुलभूत सुविधाही कोलाम वस्तीत पोहोचल्या नाहीत