चिमूर : चिमूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये लस घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह, चिमूर येथे आयोजित कोविड स्थिती संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत निर्देश दिले.
आढावा बैठकीला प्रामुख्याने भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. श्याम हटवादे, युवा नेते मनोज हजारे, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार संजय नागतिलक, चिमूरचे ठाणेदार रवींद्र शिंदे, भिसीचे ठाणेदार मनोज गभणे, उपजिल्हा रुग्णालय चिमूरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गो.वा. भगत आदी अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीत खासदार अशोक नेते यांनी माहिती घेतली असता, सद्यस्थितीत चिमूर तालुक्यात ८६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे निर्दशनास आले. चिमूर तालुका मोठा असून येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथे ५०० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात यावी व यासाठी वसतिगृह व शासकीय इमारती ताब्यात घेण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून खासगी डॉक्टराची मदत घ्या, ऑक्सिजन सिलिंडर फक्त ३३ असल्याने ते वाढविण्यात यावे, एक रुग्णवाहिका व एक स्वर्गरथ उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, चिमूर येथे डीसीएच सेंटर सुरू करण्यात यावे, असे खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.