गुन्हे दाखल : पगार व स्थायी नोकरीची मागणीभद्रावती : कर्नाटका एम्टा कोल माईन्स कंपनीच्या कामगारांनी आज बुधवारी ‘जेलभरो आंदोलन’ करुन आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.सकाळी ११ वाजता स्थानिक पेट्रोलपंप चौकातून पैदल रॅली काढून पोलीस स्टेशनमध्ये एम्टाच्या जवळपास १५० कामगारांनी प्रवेश केला. त्यापैकी ८२ कामगारांनी स्वत:ला अटक करुन ‘जेलभरो आंदोलन’ केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने जेवनाबद्दल विचारणा केली असता ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले.मागील नऊ महिन्यांपासून या कामगारांचा पगार बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळे नऊ महिन्यांचा पगार देण्यात यावा व सोबतच केपीसीएल कंपनीच्या स्थायी तत्त्वावर नोकरी देण्यात यावी, या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.एम्टाच्या कामगारांनी मागील नऊ महिन्यात १५ ते २० निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांच्या निवेदनाची कोणतीही दखल न घेता बैठक बोलाविली नाही. स्थानिक खासदारांनीदेखील अनेक आश्वासन दिले. मात्र अद्यापही एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. खासदारांतर्फे केवळ भुलथापा देण्यात येत आहे. यामुळे शेवटी कंटाळून आज कामगारांनीे जेलभरो आंदोलन केले. कामगारांवर गुन्हे दाखल केले असून वृत्त लिहेपर्यंत कामगारांना पोलीस स्टेशनच्या आवारात अटक करुन ठेवण्यात आलेली होती. (शहर प्रतिनिधी)
एम्टाच्या कामगारांचे ‘जेलभरो’ आंदोलन
By admin | Updated: January 21, 2016 01:08 IST