दिग्गजांच्या उमेदवारी : निवडणूक ठरणार लक्षवेधीनागभीड : तालुक्यातील अनेक दिग्गजांच्या उमेदवारीने चर्चेचा विषय बनलेली येथील तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १६ मार्च रोजी होत आहे. या निवडणुकीत दोन पॅनल परस्परासमोर उभ्या ठाकल्याने नेमके कोणते पॅनल बाजी मारेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य वेधले आहे.या खरेदी विक्री संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका असले तरी सर्वसाधारण गटात २७२ तर सेवा सहकारी गटात २७ मतदार आहेत. यातही सर्वसाधारण गटातील २० ते २५ मतदार मय्यत असल्याची माहिती असून मतदार कमी असल्याने या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे.या निवडणुकीत तालुक्यातील अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक आणखीच लक्ष्यवेधी ठरली आहे. चंद्रपूर जि.प. चे माजी उपाध्यक्ष व चंद्रपूर जि.म. बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. दिगंबर गुरुपुडे, बँकेचे माजी उपाध्यक्ष शांताराम देशमुख, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक गजानन पाथोडे, माजी जि.प. सदस्य चांगदेव कामडी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मोरेश्वर पिल्लेवान, पुरुषोत्तम राऊत, गिरगावचे युवा कार्यकर्ते विनोद बोरकर यांच्या उमेदवारीने ही निवडणूक आणखी चर्चेत आली आहे.परस्परांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन पॅनलपैकी एका पॅनलचे नेतृत्त्व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे हे करीत आहेत, तर दुसऱ्या पॅनलचे नेतृत्त्व शांताराम देशमुख करीत आहेत. यात उल्लेखनीय असे की, खविसंचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका कार्यक्षेत्र असले तरी तालुक्यातील काही काही गावातच मतदारांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)या खरेदी विक्री संघावर २००६ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून या संस्थेचा कारभार प्रशासकच बघत आहेत. प्रदीर्घ म्हणजे १० वर्षानंतर या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अनेकजण आस ठेवून आहेत.या संस्थेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी एक प्रतिनिधी पाठविण्यात येतो. त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. जिल्ह्यात असे मोजके मतदार असतात. या प्रतिनिधीसाठीसुद्धा हा आटापिटा असल्याची खमंग चर्चा आहे.
तालुका खरेदी विक्री संघाची आज निवडणूक
By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST